शरद पवारांकडून अजित दादांचा बालेकिल्ला उद्ध्वस्त करण्याचा “बिग प्लॅन “

Sharad Pawar's "Big Plan" to destroy Ajit Dada's stronghold

 

 

 

भोसरी पाठोपाठ चिंचवड विधानसभेतही अजित पवारांना धक्क्यावर धक्के बसू लागलेत. आता चिंचवड विधानसभा लढण्याची तयारी केलेले ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईरांनी

 

अजितदादांच्या पक्षाला रामराम ठोकायचं ठरवलं आहे. यासाठी त्यांनी आजच्या गांधी जयंतीचा मुहूर्त शोधलाय. भाऊसाहेबांनी बुधवारी सायंकाळी त्यांच्या समर्थकांचा मेळावा आयोजित केलाय. या मेळाव्यात ते त्यांची पुढची दिशा जाहीर करणार आहेत.

 

 

चिंचवड विधानसभेत भाजपच्या अश्विनी जगताप विद्यमान आमदार असल्याने ही जागा भाजपला सुटणार हे उघड आहे. काहीही करुन आपल्याला महायुतीची उमेदवारी मिळणार नाही,

 

हे स्पष्ट झाल्यानं भाऊसाहेबांनी थेट घड्याळाचे काटे फिरवण्याचा निर्णय घेतलाय. पंचवीस वर्षे मी नगरसेवक राहिलोय, 2009च्या विधानसभेत माझा विश्वासघात झालाय.

 

तीस वर्षे सातत्यानं माझ्यावर अन्याय होत आलाय, म्हणून आता मी जनतेच्या न्यायालयात जाऊन न्याय मिळविण्याची तयारी केलीये.

 

हे पाहता आजच्या मेळाव्यातून भाऊसाहेब भोईर तुतारी फुंकणार, मशाल पेटवणार की बंडखोरीचं हत्यार उपसणार? याकडे सर्वांचं लक्ष आहे.

 

गेल्या काही दिवसांतील राजकीय घडामोडी पाहता सलग पंधरा वर्षे एकहाती सत्ता राखलेल्या अजित पवारांचा बालेकिल्ला उद्ध्वस्त होऊ लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

 

2017च्या पालिका निवडणुकीत भाजपची सत्ता आली. तत्पूर्वी अजित पवारांनी राष्ट्रवादीची एकहाती सत्ता राखली. त्यामुळंच ‘अजित पवार बोले, तैसे पिंपरी चिंचवड चाले’ असं समीकरण बनलं.

 

म्हणूनचं राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अपवाद वगळता सरसकट सर्वांनी अजित दादांना साथ दिली. मात्र आजवर भाजपशी दोन हात केलेल्या अजित दादांच्या शिलेदारांना

 

आगामी विधानसभा अन पालिका निवडणुकीत स्वतःचं अस्तित्व राखायचं आहे. म्हणूनचं अजित दादांना धक्क्यावर धक्के देत त्यांचे समर्थक तुतारी फुंकत, पुन्हा शरद पवारांशी घरोबा करताना दिसत आहेत.

 

 

अलीकडेच शहराध्यक्ष अजित गव्हाणेंनी दोन माजी महापौर आणि पंधरा माजी नगरसेवकांसह अजित दादांची साथ सोडत तुतारी फुंकली होती.

 

तर दसऱ्याच्या दरम्यान माजी आमदार विलास लांडे, त्यांची पत्नी माजी महापौर मोहिनी लांडे आणि मुलगा विक्रांत लांडे ही तुतारी फुंकणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

 

एकीकडे गेल्या वर्षीच्या पोटनिवडणुकीत पराभूत झालेले नाना काटे यंदा भाजपसोबत दोन हात करण्यास सज्ज आहेत, यासाठी शरद पवारांच्या पक्षात त्यांनी स्वतंत्रपणे फिल्डिंग लावलेली आहे.

 

दुसरीकडे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष प्रशांत शितोळे, मोरेश्वर भोंडवे, मयूर कलाटे, विनोद नढे या माजी नगरसेवकांनी शरद पवारांची

 

उघडपणे भेट घेतली अन आम्ही एकूण पंधरा माजी नगरसेवक तुतारी फुंकण्यासाठी श्वास रोखून उभे आहोत, असा दावा केला.

 

तिसरीकडे ज्येष्ठ नेते माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर सुद्धा अजित दादांना आज रामराम ठोकणार आहेत. यासाठी संध्याकाळी होणाऱ्या समर्थकांच्या मेळाव्यात ते चिंचवड विधानसभा

 

कोणत्या चिन्हावर की अपक्ष लढणार याची घोषणा करणार आहेत. आगामी विधानसभेच्या तोंडावर अजित दादांना एकामागोमाग एक बसणारे हे धक्के पाहता, त्यांचा बालेकिल्लाचं उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *