मराठवाड्यात अवैध वाळू प्रकरणात फौजदारासह पाच पोलीसावर निलंबनाची कारवाई
Suspension action against five policemen along with criminal in illegal sand case

आज दिनांक 11.10.2024 रोजी लोहा येथील बायपास रोडवर काही पोलीस अधिकारी व अंमलदार हे वाळू वाहतूक करणारी वाहने अडवून,
त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई न करण्यासाठी पैसे स्वीकारत असल्याची माहिती पोलीस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांना प्राप्त झाली होती.
पोलीस उप महानिरीक्षक यांना मिळालेल्या माहितीनुसार, सदर ठिकाणी थांबलेले पोलीस हे नांदेड येथील विशेष पथकात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक श्री प्रवीण हलसे व इतर चार अंमलदार होते.
हे सर्वजण पहाटेचे वेळी वाळूची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी एका खाजगी वाहनातून लोहा येथे गेले होते. उपरोक्त माहिती,
त्वरित उपविभागीय पोलिस अधिकारी, उपविभाग कंधार श्रीमती अश्विनी जगताप यांना देण्यात येऊन, त्यांना लोहा येथे रवाना होण्याबाबत कळविण्यात आले.
मात्र, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती जगताप ह्या लोहा येथे पोहोचण्यापूर्वीच, नमूद अधिकारी व अंमलदार हे त्यांच्याजवळील खाजगी वाहनातून लोहा येथून नांदेडकडे निघाल्याने सकाळी, 08.15 वाजण्याच्या दरम्यान,
पोलीस अधीक्षक कार्यालयाजवळील तिरंगा चौकात, नाकाबंदी करून सदर वाहनास रोखण्याबाबत श्रीमती जगताप यांना कळविण्यात आले. त्याप्रमाणे श्रीमती जगताप यांनी सदरचे वाहन तिरंगा चौकात अडविले असता,
त्यात पोलीस उपनिरीक्षक श्री प्रवीण हलसे व पोलीस हवालदार श्री ब्रह्मानंद लामतुरे आढळून आले. वाहनांमधील पोलीस अधिकारी व अंमलदाराची झडती घेतली असता,
दोघांच्या झडतीत,त्यांच्याकडे 1,03,000/- (एक लाख तीन हजार) रुपयांची रोकड मिळून आली. यातील, आणखी तीन पोलीस अंमलदार, पोलीस कॉन्स्टेबल राम मुळे, पोलीस कॉन्स्टेबल महेश कावळे व पोलीस कॉन्स्टेबल तुकाराम जुन्ने हे परतीचे प्रवासात लोहा येथेच थांबल्याचे आढळून आले.
सदर प्रकरणी, पोलीस उपमहानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी या पाचही जणांना निलंबित केले असून त्यांची प्राथमिक चौकशी
उपविभागीय पोलिस अधिकारी, देगलूर यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. वाळू वाहतुकीबाबत अधिक माहिती प्राप्त केली असता,
नांदेड ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील मौजे वाहेगाव भंगी येथून सदर वाळूची वाहतूक होत असल्याची बाब पोलीस उप महानिरीक्षक श्री उमाप यांचे लक्षात आल्यावर,
त्यांनी सोनखेड पोलीस ठाण्याचे सपोनि श्री पांडुरंग माने यांना याबाबतची खातरजमा करण्यासाठी मौजे वाहेगाव भंगी येथे पाठविले असता,
सदर ठिकाणी गोदावरी नदीपात्रातून सुमारे 50 तराफ्यांचे सहाय्याने 100 हून अधिक मजूर वाळू उपसा करत असल्याचे आढळून आले. गोदावरी नदीकाठी
अशाप्रकारे एकूण सहा ठिकाणी सुमारे 300 ब्रास वाळू नदीपात्रातून बाहेर काढून साठवून ठेवल्याचेही आढळून आले.
सदर माहितीवरून, पोलीस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी
जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून, महसूल विभागास पाचारण केले. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांकडून रात्री उशिरापर्यंत पंचनाम्याचे काम सुरू असून,
संबंधिताविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. आज रात्री, सदर ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून उद्या सकाळपासून कारवाईला पुन्हा सुरुवात होणार आहे.