कुंभमेळ्यात स्नान करताना राष्ट्रवादीच्या नेत्याचा मृत्यू
NCP leader dies while bathing at Kumbh Mela
प्रयागराज येथे सुरू झालेल्या महाकुंभमेळ्यात गेलेले सोलापूरचे माजी महापौर महेश विष्णुपंत कोठे (वय ६०) यांचा कडाक्याच्या थंडीत गंगास्नान करताना हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाला.
मंगळवारी सकाळी ही घटना घडली. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे स्थानिक नेते असलेले महेश कोठे हे महाकुंभमेळ्यासाठी आपल्या काही मित्रांसह प्रयागराजला गेले होते.
तेथे सकाळी कडाक्याच्या थंडीत गंगा नदीमध्ये स्नान आटोपत असताना त्यांना अचानकपणे हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक पुत्र आणि दोन कन्या, सून, जावई असा परिवार आहे. भाजपचे आमदार देवेंद्र कोठे हे त्यांचे पुतणे आहेत.
सोलापूरचे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते आणि सोलापूर महानगरपालिकेचे माजी महापौर महेश कोठे यांचे निधन झाले. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याची माहिती मिळतंय.
महेश कोठे यांच्या निधनाबद्दल कळताच सोलापूरमध्ये दु:खाचे वातावरण बघायला मिळत आहे. थंडीमध्ये रक्त गोठल्याने त्यांना हृदयविकाराच्या झटका आल्याची माहिती आहे.
महेश कोठे हे आपल्या काही मित्रांसोबत कुंभमेळाव्यात सहभागी होण्यासाठी गेले होते. यादरम्यानच त्यांना हृदयविकाराच्या झटका आला.
मिळालेल्या माहितीनुसार, महेश कोठे हे प्रयागराज येथे कुंभमेळ्यासाठी गेले होते, थंडीमुळे रक्त गोठले आणि त्याच वेळेस त्यांना हृदयविकाराचा जोरदार झटका आला.
हॉस्पिटलमध्ये नेण्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. महेश कोठे हे विष्णुपंत कोठे यांचे चिरंजीव होते. विष्णुपंत कोठे आणि महेश कोठे हे माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जात होते.
सोलापूरमधील काँग्रेस मजबूत करण्यासाठी आणि सोलापूर महानगरपालिकेत काँग्रेसची सत्ता आणण्याकरिता कोठे परिवाराची भूमिका अत्यंत महत्वाची होती.
कालानंतराने महेश कोठेंनी काँग्रेस पक्षातून शिवसेना आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्ष असा प्रवास केला होता. महेश कोठे यांच्या अकाली निधनाने सोलापूर मधील राजकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महेश कोठे यांनी सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातुन राष्ट्रवादी पक्षातुन निवडणूक लढवली होती.
भाजपचे विजयकुमार देशमुख यांना जोरदार टक्कर दिली होती. सोलापूर महापालिकेमध्ये त्यांनी महापौरपद भूषवले. महापालिकेतील एक दिग्गज नेते म्हणून त्यांचे संपूर्ण महाराष्ट्रात नाव होते.
महानगरपालिकेचा प्रचंड अनुभव असलेल्या नेत्याचे अचानक निधन झाल्याने सोलापुरात हळहळ व्यक्त होत आहे. विमानाने त्यांचे पार्थिव सोलापुरात आणण्यात येणार आहे. कार्यकर्त्यांनी त्यांच्या घरी जमण्यास सुरूवात केलीये.