१८ गावांमधील लोकांना अचानक टक्कल;तुमच्या गावातही घडू शकते ,’तज्ज्ञांनी व्यक्त केली भीती?
People in 18 villages suddenly go bald; Could it happen in your village too, experts express fear?

बुलढाणा जिल्ह्यातील १८ गावांमधील लोकांना अचानक टक्कल पडू लागलं. टक्कल पडणाऱ्यांची संख्या वाढत गेली. या सगळ्याचं मूळ पंजाब, हरयाणातील शिवालिक पर्वतरांगांच्या पायथ्याशी असल्याचा निष्कर्ष ज्येष्ठ संशोधक,
अभ्यासक डॉ. हिम्मतराव बावस्कर यांनी काढला आहे. यासाठी त्यांनी स्वखर्चानं शेवटच्या टोकापर्यंत शोध घेतले. एवढ्यावरच न थांबता त्यांनी त्यासाठीचे उपायही शोधून काढले. याबद्दलच वृत्त लोकमतनं दिलं आहे.
‘बुलढाण्यातील त्या गावातील सगळे ग्रामस्थ रेशनच्या दुकानावर अवलंबून आहेत. रेशनमध्ये मिळणारा गहू त्यांच्या या आजाराचं कारण ठरला,’ अशी माहिती बावस्कर यांनी दिली.
‘बोंदगावचे सरपंच रामेश्वर धारकर यांच्याकडून गावात येणाऱ्या गव्हाच्या पोत्यांचे फोटो, गव्हांचे नमुने मागवून घेतले. ते गहू पंजाब, हरयाणामधील शिवालिक पर्वतरांगांच्या पायथ्याशी असणाऱ्या भागातील होते हे सिद्ध झालं,’ असं बावस्कर यांनी सांगितलं.
‘शिवालिक पर्वतरांगांतून पावसाळ्यात मोठे झरे प्रवाहित होतात. तिथल्या दगडांमध्ये सेलेनियमचं प्रमाण अधिक आहे. झऱ्यांच्या पाण्यासोबत ते शेतीत पसरलं. त्या भागात शेतकऱ्यांनी तशा जमिनीला कुंपण घातलं आहे.
इथं पीक घेऊ नका, असंही सांगितलं आहे. गव्हामध्ये सेलेनियम शोषून घेण्याची क्षमता इतर पिकांपेक्षा जास्त असतं. त्या भागात पिकलेले गहू रेशन दुकानांच्या माध्यमातून बुलढाणा भागात आले. हे त्या पोत्यांवर छापलेल्या माहितीवरुन सिद्ध झालं आहे,’ अशी माहिती बावस्कर यांनी दिली.
पंजाब, हरयाणाच्या भागातून येणाऱ्या गव्हात सेलेनियमचे प्रमाण किती आहे, हे सरकारनं गहू वितरण करण्याआधीच तपासावं, तशी तपासणी न करता गव्हाचं वाटप झाल्या, जे बुलढाण्यात घडलं, ते महाराष्ट्रात कुठेही घडू शकतं, अशी भीती डॉ. बावस्कर यांनी बोलून दाखवली.
बुलढाण्यात जो प्रकार घडला, त्याबद्दल आयसीएमआरकडून लवकरच अहवाल येणार आहे असं सांगण्यात येत होतं. पण आयसीएमआरनं याबद्दल अद्याप कोणताही अहवाल दिलेला नाही.
आयसीएमआरसारखी संस्था या विषयात अजूनही गप्प बसत असेल तर मग लोकांनी कोणाकडे बघायचं, असा प्रश्न उपस्थित होत आहे.