युतीला बाजूला ठेवून भाजपची लोकसभा लढवण्याची तयारी? शिंदे, अजित पवार गटात अस्वस्थता
Keeping the alliance aside, BJP's preparation to contest the Lok Sabha? Uneasiness in Shinde, Ajit Pawar group
महायुतीला बाजूला ठेवून रायगडमधून लोकसभा निवडणूक लढवण्याची रणनीती भाजप करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे .
त्यामुळे शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. पुढील वर्षात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने तयारी सुरू केली आहे.
युती, आघाड्यांची वाट न पाहता प्रत्येक लोकसभा मतदारसंघात उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे.भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे महाविजय २०२४ मोहिमेच्या निमित्ताने राज्यभर फिरत आहेत.
कार्यकर्त्यांचा मेळावे घेत आहेत. राज्यातील ४८ लोकसभेच्या जागांपैकी ४५ जागा आम्हाला जिंकायच्या आहेत असे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे सांगत आहेत.
बावनकुळे यांच्या दौऱ्याने शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे रायगडचे विद्यमान खासदार आहेत. त्यामुळे आगामी लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून या जागेवर हक्क सांगितला जाणे स्वाभाविक आहे.
महायुतीच्या माध्यमातून खासदार सुनील तटकरे यांना पुन्हा एकदा लोकसभेची उमेदवारी दिली जाऊ शकते; मात्र तरीही बावनकुळे यांनी आपल्या दौऱ्यात रायगडचा पुढील खासदार हा भाजपचाच असेल, असे जाहीर करून टाकले.
भाजपच्या दक्षिण रायगडचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील हे भाजपचे उमेदवार असतील, असे स्पष्ट संकेत त्यांनी दिले. त्यामुळे तटकरे यांना बाजूला ठेवून भाजपने लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केल्याचे दिसून येत आहे.
धैर्यशील पाटील यांची उमेदवारी अधिकृतपणे जाहीर झालेली नाही; मात्र भाजपचा उमेदवार दिवाळीनंतर जाहीर होणे अपेक्षित आहे.
आम्हाला भाजपचाच उमेदवार जिंकून आणायचा आहे. त्यासाठी तयारी सुरू आहे. सुनील तटकरे विद्यमान खासदार आहेत. महायुतीचे नेते त्यांचा नक्कीच विचार करतील.
दरम्यान महायुतीचा लोकसभेचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती येत आहे. यामध्ये भाजप 26 जागा लढवणार तर शिंदे- अजित पवार गट मिळून 22 जागांवर लढणार आहेत. एका दैनिकाच्या मुलाखतीत खुद्द देवेंद्र फडणवीसांनी याबाबत माहिती दिली.
महायुतीमध्ये भाजप, शिवसेना आणि अजित पवार गटामध्ये कुणाला किती जागा मिळणार, याबाबत तर्क लढवले जात होते.
आता खुद्द देवेंद्र फडणवीस यांनीच खुलासा केला आहे. शिवसेना आणि अजित पवार गटाला हे जागावाटप मान्य असेल का, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही.
महायुतीचा आणि भाजपचा वेगळा सर्व्हे झालेला आहे. त्यातून महायुतीला अंदाज आलेला असून ज्या जागा भाजप जिंकू शकतं त्या जागांवर भाजप लढणार आहे. केंद्रात सरकार निवडून आणण्यासाठी महायुतीकडून ताकद लावण्यात येणार आहे.