राष्ट्रवादीच्या नेत्याने काँग्रेस नेत्याला उमेदवारीसाठी दीड लाखाला फसवले
NCP leader cheats Congress leader of Rs 1.5 lakh for candidacy

विधानसभा निवडणुकीत नगर शहर विधानसभा मतदारसंघाच्या जागेसाठी उमेदवारी देण्याच्या नावाखाली फसवणूक झाल्याची तक्रार काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय ओबीसी समन्वयक मंगल विलास भुजबळ यांनी पोलिसांकडे दाखल केली आहे.
त्यानुसार नगर शहरातील कोतवाली पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचा प्रदेश युवक उपाध्यक्ष बालराजे पाटील (पूर्ण नाव व पत्ता नाही) याच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
विधानसभेच्या उमेदवारीसाठी (तिकीटासाठी) बालराजे पाटील याने पक्षाला निधी देण्याच्या बहाण्याने ही फसवणूक केल्याचे मंगल भुजबळ यांनी फिर्यादीत नमूद केले आहे.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारीसाठी मंगल भुजबळ इच्छुक होत्या.
मात्र महाविकास आघाडीच्या जागा वाटपात नगर शहराची जागा राष्ट्रवादीकडे गेली व राष्ट्रवादीने या जागेसाठी माजी महापौर अभिषेक कळमकर यांची उमेदवारी जाहीर झाली असले तरी त्यांना तिकीट मिळणार नाही,
काँग्रेसला जागा मिळणार आहे, मात्र त्यासाठी तुम्हाला राष्ट्रवादीला फंड द्यावा लागेल, तिकीट निश्चित होण्यासाठी टोकन म्हणून १ लाख रुपये भरावे लागतील, असे सांगून बालराजे पाटील याने
आपल्याला एका बँक खात्यावर पैसे पाठवण्यास सांगितले. त्यावर विश्वास ठेवून टप्प्याटप्प्याने एकुण १.५ लाख रुपये पाठवले. परंतू अखेर राष्ट्रवादी काँग्रेसने अभिषेक कळमकर यांनाच उमेदवारी दिली.
त्यानंतर आपण बालराजे पाटील याला पैसे परत मागितले, परंतु त्याने टाळाटाळ केल्याने फसवणूक झाल्याचे मंगल भुजबळ यांनी फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीनुसार कोतवाली पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.