आता छगन भुजबळांविरोधात मराठा समाज आक्रमक; प्रत्युत्तर देण्याचा मोठा प्लान
Now the Maratha community is aggressive against Chhagan Bhujbal; Big plan to respond
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर सडकून टीका केली.
जालन्यातील अंबड येथील ओबीसी एल्गार मोर्चात त्यांनी जरांगे यांच्या शाब्दिक हल्ला चढवला. यावरून आता मराठा समाज आक्रमक झाला असून छगन भुजबळांना प्रतिउत्तर देण्यासाठी जालन्यात मोठा प्लान आखण्यात आला आहे.
मनोज जरांगे यांच्यावर छगन भुजबळ यांनी केलेली टीका मराठा समाजाच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. भुजबळांना प्रतिउत्तर देण्यासाठी जालना शहरात पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांच्या भव्य सभेचं आयोजन करण्यात येणार आहे.
१ डिसेंबर रोजी ही सभा होणार असून सभेआधी शहरात रॅली काढण्यात देखील काढली जाणार आहे. जालना शहरात आयोजित केली जाणारी सभा राज्यभरात रोल मॉडेल म्हणून राबवली जाणार आहे.
या सभेला जवळपास १२ ते १५ लाख मराठा बांधव येणार असल्याची माहिती मराठा संघटनांनी दिली आहे. त्यामुळं आता या सभेत मनोज जरांगे पाटील नेमकी काय भूमिका मांडणार? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे. पोलिसांनी या सभेला परवानगी दिली की नाही? हे अजून स्पष्ट झालेलं नाही.
छगन भुजबळांविरोधात मराठा समाज आक्रमक झाला असून राज्यात ठिकठिकाणी आंदोलने करण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात छगन भुजबळ यांच्याविरोधात मराठा समाजाने घोषणाबाजी केली आहे. काही ठिकाणी भुजबळ यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडेही मारण्यात आले .
छगन भुजबळ यांच्या नाशिक येथील निवासस्थानी पोलीस सुरक्षतेत वाढ करण्यात आली आहे. कुठल्याही अनुसूचित घटना घडू नये, यासाठी भुजबळ फार्मवर पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला आहे. तर परिसरात पोलिसांची पेट्रोलिंग देखील वाढवण्यात आली आहे.
दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली. गंगापूर तालुक्यातल्या गवळी शिवरा इथं मनोज जरांगे पाटील यांचा लावण्यात आलेला बॅनर अज्ञात व्यक्तीने फाडला. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला त्यावरून पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे एफआयआरमध्ये मंत्री छगन भुजबळ यांचं नाव आहे. ओबीसी एल्गार मेळाव्यात बोलताना मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा समाजाचे आरक्षणाचे बॅनर काढून टाका, असे बोलल्यामुळे बॅनर फाडण्यात आल्याचा आरोप पोलिसांच्या एफआयआरमध्ये करण्यात आला आहे.
संदीप भाऊसाहेब औताडे यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्ती विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, थेट भुजबळ यांचे एफआरमध्ये नाव आल्याने त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पुन्हा ओबीसी विरुद्ध मराठा असा वादही रंगण्याची चिन्हे आहेत.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नागपूर ते मुंबईला जाणाऱ्या रस्त्यावरील गवळी शिवरा कमानीजवळ मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा साखळी उपोषणाचे बँनर फाडण्यात आले आहे. सर्व प्रकारास छगन भुजबळ हे जबाबदार असून त्यांच्या विरुद्ध प्रक्षोभक भाषण करुन त्यांनी सकल मराठा समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला आहे.
मंत्री छगन भुजबळ यांचे विरुध्द कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. छगन भुजबळ यांनी जालन्यातील ओबीसी मेळाव्यात मार्गदर्शन करताना मनोज जरांगे पाटील यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती. तसचं त्यांनी महाराष्ट्रामध्ये गावोगावी लावलेले मराठा समाजाचे आरक्षणाचे बँनर काढून टाका अशा प्रकारचे चिथावणीखोर वक्तव्य केले होते.