भाजपच्या दाव्याने शिंदेंच्या खासदार पुत्राची उमेदवारी धोक्यात
The candidature of Shinde's MP son is in jeopardy due to BJP's claim

लोकसभेत घवघवीत यश मिळवलेले खासदार संदीपान भुमरे यांना विधानसभेत अडचणींचा सामना करावा लागू शकतो. पैठणचे आमदार म्हणून राहिलेले
आणि आताचे विद्यामान खासदार संदीपान भुमरे यांची डोकेदुखी वाढणार आहे. पैठणच्या जागेवरुन युतीत रस्सीखेच सुरु झाली आहे. भाजपा नेते माजी तालुका अध्यक्ष डॉ. सुनील शिंदे यांनी
पैठणची जागा भाजपसाठी सोडण्यात यावी अशी मागणी भाजपा पक्षश्रेष्ठी कडे लावून धरल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे शिंदेंची सेना सुद्धा पैठणसाठी आग्रही असल्याचे दिसून येत आहे.
१९९० पासुन पैठण तालुका हा भाजपा आणि शिवसेना युतीचा बालेकिल्ला राहिला आहे. पैठण तालुका हा फक्त शिवसेनेचा बालेकिल्ला आहे,
असे म्हणणे चुकीचे असल्याचे डॉ. सुनील शिंदे यांनी म्हटले आहे. १९९० पासून संदीपान भुमरे हे युतीचे आमदार राहीले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगरची जागा शिवसेनेला सोडली होती.
यानिवडणूकीत भाजपाने एकनिष्ठेने काम केले म्हणून संदीपान भुमरे खासदार झाले आहे. आता पैठण विधानसभेची जागा महायुतीने भाजपासाठी सोडावी असा आमचा आग्रह आहे. यासाठी आम्ही पक्षश्रेष्ठींकडे मागणी केली असल्याचे डॉ. सुनील शिंदे यांनी सांगितले आहे.
मराठवाड्यातल्या निवडणुकीचं समीकरण हे उर्वरित महाराष्ट्रापेक्षा वेगळं आहे. कारण, ओबीसी आणि मराठा आंदोलनाची केंद्र ही मराठवाड्यातच होती आणि
त्याची सर्वात जास्त धग आजही याच भागात पाहायला मिळते. परिणामी निवडणुकीत उतरायचं तर उमेदवार चारही बाजूंचा विचार करतोय.
आता भाजपच्या आग्रहामुळे महायुतीच्या जागा वाटपा दरम्यान पैठण विधानसभेची जागा आपल्या वाट्याला यावी यासाठी खासदार संदीपान भुमरे यांना मोठी कसरत करावी लागणार आहे.
पैठण विधानसभा मतदारसंघातून खासदार संदीपान भुमरे यांचे पुत्र विलास भुमरे हे निवडणूकीच्या तयारीला लागले आहे. अशातच पैठण विधानसभेवर भाजपाने दावा केल्याने
खासदार संदीपान भुमरे यांनी डोकेदुखी वाढणार असल्याचे बोलले जात आहे. अशात आता युतीचे दिग्गज कसा मार्ग काढतात हे पाहणे महत्त्वाचे आहे.