उष्णतेची लाट;एकाचा मृत्यू ,100 शेळ्यांचा मृत्यू ,ट्रक पेटला
Heat wave; one dead, 100 goats dead, truck caught on fire
राज्यात विदर्भ, खान्देशासह मराठवाड्यात उष्णतेची लाट कायम असून, पारा चाळिशीपार गेला आहे.आज रविवारी परभणीचे तापमान ४४अंशांवर आहे.
विदर्भातील अकोल्यात शनिवारी उच्चांकी ४५.५ तापमानाची नोंद झाली, तर खान्देशातील जळगावचे तापमान ४३.८ अंशांवर गेले.
वाढत्या तापमानामुळे भंडाऱ्यात एकाचा उष्माघाताने मृत्यू झाला असून, प्रशासनाने दक्षतेच्या सूचना दिल्या आहेत. विदर्भासह राज्यातील काही भागांत
तापमानाचा पारा घसरण्याची चिन्हे नसल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे अकोल्यात जमावबंदीचे १४४ कलम लागू करण्यात आले आहे.
गेल्या आठवड्यापासून जळगाव जिल्ह्यात आलेली उष्णतेची लाट अद्याप कायम आहे. चार दिवस ४५ अंशांपर्यंत पोहोचलेल्या तापमानात किंचित घट झाली असून,
शनिवारी ४३.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, कामगारांना तसेच विद्यार्थ्यांना उष्माघाताचा त्रास होऊ नये,
यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी २५ मे ते ३ जून या कालावधीत कामगारांकडून उन्हात काम करून घेऊ नये तसेच खासगी कोचिंग क्लासेसच्या वेळेत बदल करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा काकोडा गावात मेंढपाळांच्या सुमारे १०० शेळ्यांचा उष्माघातामुळे मृत्यू झाला आहे.
स्थानिक पशुचिकित्सकांनी केलेल्या शवविच्छेदनात उष्माघातामुळेच दगावल्याचे निष्पन्न झाले. आमदार चंद्रकांत पाटील यांनी घटनास्थळी जाऊन स्थितीचा आढावा घेतला.
जामनेर तालुक्यात भवानी माथाजवळ जळगाव- संभाजीनगर रस्त्यावर शुक्रवारी अचानक एका ट्रकने पेट घेतला. या ट्रकमधून गव्हाच्या पोत्यांची वाहूतक करण्यात येत होती.
उन्हामुळे या पोत्यांना आग लागल्यामुळे ट्रकने पेट घेतला. ट्रक पेटल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत ट्रकचे मोठे नुकसान झाले होते.
नागपूर मध्ये गेल्या आठवड्यात ढगाळ वातावरणामुळे तापमानात थोडा चढ-उतार असला तरी या आठवड्यात मात्र तापमानाने उच्चांक गाठला आहे.
अकोल्यात २३ मेस कमाल तापमान ४५.५ अंश एवढे नोंदवले गेले, तर, यात वाढ होऊन शनिवारी हे तापमान ४५.६ अंशांवर नोंदवले गेले.
विदर्भातील हे उच्चांकी तापमान आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यातील तापमान ४० अंशांच्या पुढे गेल्याने विदर्भात उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
यवतमाळ येथे ४५.५ अंश सेल्सिअस तापमान होते. उष्णतेची ही लाट पुढील आठवड्यात सुद्धा राहणार असल्याचे संकेत हवामान विभागाकडून मिळाल्यामुळे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी अकोल्यामध्ये १४४ कलम लागू केले आहे.
त्यामुळे विनाकारण जमावबंदी करून उष्मघाताचा धोका होऊ नये यासाठी अकोल्यात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आली आहे.
भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील खैरी/पट येथील ४५ वर्षीय व्यक्तीचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. होमराज बाबूराव भागडकर (वय ४५) असे या मृतकाचे नाव आहे.
ही घटना शनिवारी घडली. जिल्ह्याचे तापमान मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अशातच प्रखर उन्हामुळे होमराज यांची प्रकृती बिघडली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.