भाजपने पळवला आठवलेंचा उमेदवार कमळ चिन्हावर निवडणूक रिंगणात ;आठवले गटात मोठी अस्वस्थता
BJP ran Athawale's candidate in the election arena on the lotus sign; there is great discomfort in the Athawale group

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप अन्य छोट्या पक्षांनाही जागा देण्याची रणनीती आखली जात आहे. भाजपने आपल्या कोट्यातून महाराष्ट्रातील 4 विधानसभा जागा मित्र पक्षांना दिल्या आहेत.
ज्या पक्षांना जागा देण्यात आल्या आहेत, त्यात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या आरपीआय (ए) पक्षाचाही समावेश आहे. महाआघाडीत आठवले यांचा पक्ष
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला 2 जागा देण्यात आल्या आहेत. कलिना विधानसभेची जागा भाजपच्या कोट्यातून आणि धारावी विधानसभेची जागा शिवसेनेच्या कोट्यातून देण्यात आली आहे.
महायुतीत भाजपने आपल्या कोट्यातून रामदास आठवलेंच्या ‘रिपाइं’ ला एक जागा दिलीय. मुंबईतील कलिना मतदारसंघ आठवलेंच्या पक्षाला देण्यात आला आहे.
या मतदारसंघातील आठवलेंचा उमेदवार भाजपच्या कमळ चिन्हावरच लढणार आहेत. यात कलिना मतदारसंघातून आठवलेंच्या पक्षाच्या नावाने दिलेले उमेदवार अमरजितसिंह हे भाजपाचेच नेते आहेत.
अमरजितसिंह हे संघाचे कट्टर समर्थक आहेत. त्यांचे संघ स्वयंसेवकांच्या गणवेषातील काही फोटोही सध्या समोर आले आहेत. त्यामुळे भाजपच्या कमळ चिन्हावर रिपाइं चा उमेदवार असला तरी आठवले गटात मोठी अस्वस्थता असल्याचे बोलले जात आहे.
कधीकाळी ‘पँथर’ चळवळीत संघ आणि संघ विचारसरणीला विरोध करणाऱ्या रामदास आठवलेंना पक्षाच्या कोट्यातला उमेदवार संघ स्वयंसेवक कसा चालतो? असा सवाल आता पक्षातील अनेक नेते
आणि कार्यकर्त्यांना सतावत आहे. पक्षाच्या तोंडाला महायुतीत पाने पुसल्याने सध्या आठवले गटात मोठी अस्वस्थता आहे. यावर रिपाइंच्या पक्षांतर्गत अनेक वाट्सअप गृपवर हा असंतोष धुमसतोय.
विधानसभेत महायुतीच्या प्रचारापासून दूर राहण्यावर सध्या पक्षाच्या सर्व विभागीय नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये ‘खल’ सुरू असल्याची विश्वसनीय सुत्रांची माहिती आहे.
रिपाइंत रामदास आठवलेंच्या तिकीट वाटपावरील मवाळ भूमिकेचाही संताप पुढे येऊ लागला आहे. महायुतीच्या जागा वाटपाच्या चर्चेत ‘रिपाइं’
आठवले गटाला सहभागी न करणे, मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आठवलेंना ताटकळत ठेवण्यात आल्यानेही पक्षात संताप उफाळून आला आहे.
‘रिपाइं’ने महायुतीला सर्वात आधी 12 जागांचा प्रस्ताव दिला होता. त्यातील धारावी, चेंबूर, केज, पुणे जिल्ह्यातील एक जागा आणि यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेडच्या अशा 5 जागांवर रिपाइं आठवले गटाचा आग्रह होता.
मात्र, शेवटी दिलेल्या एका जागेवरही भाजपने आपलाच उमेदवार दिल्याने रिपाइं कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. आठवलेंच्या मवाळ भूमिकेने पक्षात वादळापुर्वीची शांतता असल्याचे बोलेले जात आहे.