प्रमोद महाजनांच्या भावजयीचा धनंजय मुंडे, पंकजा मुंडेंवर गंभीर आरोप
Dhananjay Munde, brother-in-law of Pramod Mahajan, serious allegations against Pankaja Munde

दिवंगत नेते प्रवीण महाजन यांची पत्नी सारंगी महाजन यांनी धनंजय मुंडे यांच्यासह पंकजा मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. दोन्ही मुंडे बहीण भावाने संगनमताने धाक दाखवून
आणि कारस्थान रचून जबरदस्तीने कोट्यवधी रुपयांची जमीन अल्प किमतीत खरेदी केली असल्याचा आरोप सारंगी महाजन यांनी केला. प्रवीण महाजन यांच्या नावे असलेली बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यामधील मौजे जिरेवाडी
येथील गट नंबर 240 मधील करोडो रुपये किमतीची 36.50 आर जमीन धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी जबरदस्तीने घेतली असल्याच त्यांनी म्हटले आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील पत्रकार परिषदेत त्यांनी हे आरोप केले आहेत. सारंगी महाजन यांच्या या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. यावर आता धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे काय उत्तर देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
परळीत माझी 63.50 आर जमीन होती, 36 आर जमीन फ्रॉड करुन विकली. मला परळीच्या अनुसूया हॉटेलमध्ये बोलावून घेतले. मला तिथून रजिस्ट्रार ऑफिसला नेले.
तिकडे माझ्याकडून सही करुन घेण्यात आली. कोणी जमीन घेतली, हे आम्हाला माहिती नाही. तिकडून आम्हाला गोविंद बालाजी मुंडेने घरी नेले, जेवू घातले.
त्यानंतर ब्लँक पेपरवर सह्या घेतल्या. त्याला मी विरोध केला असता त्याने म्हटले की, सही केल्याशिवाय धनुभाऊ तुम्हाला परळी सोडून देणार नाहीत,
अशी धमकी दिल्याचे सारंगी महाजन यांनी सांगितले. गोविंद बालाजी मुंडे याने आम्हाला ठाण्यातील घरी आणून सोडले. त्यानंतर आमच्याकडून त्याने एक लाख रुपये घेतले, असेही सारंगी महाजन यांनी सांगितले
धनंजय मुंडे हे परळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. मराठवाड्यातील मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षामुळे परळी विधानसभेची लढाई अटीतटीची होण्याची शक्यता आहे.
या निवडणुकीच्या तोंडावर सारंगी महाजन यांनी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करत एकच खळबळ उडवून दिली आहे.
सारंगी महाजन यांचे पती प्रवीण महाजन यांनी 22 एप्रिल 2006 रोजी भाजपचे लोकप्रिय नेते प्रमोद महाजन यांची गोळ्या झाडून हत्या केली होती. प्रवीण महाजन हे प्रमोद महाजन यांचे बंधू होते.
यानंतर प्रवीण महाजन यांनी वरळी पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले होते. त्यानंतर प्रवीण महाजन काही काळ तुरुंगात होते. ते 2021 साली पॅरोलवर सुटून बाहेर आले
असताना त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यांच्या मेंदूत रक्ताच्या गुठळ्या तयार झाल्या होत्या. ते जवळपास अडीच महिने कोमात होते. यानंतर ठाण्यातील एका रुग्णालयात प्रवीण महाजन यांचे निधन झाले होते.