उमेदवारावरून भाजप -शिंदेसेनेत पेच;शिंदेंच्या त्या’ निर्णयामुळे महायुतीचं टेन्शन वाढलं?
Embarrassment in BJP-Shindesena over the candidate; Has Shinde's decision increased the tension of the Grand Alliance?
विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतशी राज्यात कोणाचं सरकार येणार? कोणाच्या बाजुनं मतदार कौल देणार याची उत्सुकता देखील शिगेला पोहोचली आहे.
महाराष्ट्रात पहिल्यांदाच गुंतागुतीची राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे. दोन बड्या पक्षात पडलेल्या फुटीनंतर ही पहिली विधानसभा निवडणूक आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये या निवडणुकीत अनेकांनी बंडखोरी केल्याचं पहायला मिळालं.
आधीच या बंडखोरांमुळे महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांची डोकेदुखी वाढली आहे. आता त्यात भरीसभर म्हणजे अनेक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीच्या नावाखाली एकाच गटातील दोन पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज भरले आहेत.
श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात देखील ही स्थिती आहे. श्रीरामपूरमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून लहू कानडे हे उमेदवार आहेत तर त्याच मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून देखील उमेदवार देण्यात आला आहे.
शिवसेना शिंदे गटाकडून भाऊसाहेब कांबळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र राष्ट्रवादी अजित पवार गटाचे लहू कानडे हेच श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे अधिकृत उमेदवार असल्याचं पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जाहीर केलं आहे.
मात्र असं असताना देखील आता या मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपले उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्यासाठी जाहीर सभा घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.
शिवसेनेचे राज्य सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी एकनाथ शिंदेंच्या या होणाऱ्या सभेबाबत माहिती दिली आहे. परंतु यावर प्रतिक्रिया देताना पालकमंत्री विखे पाटील यांच्याकडून या मतदारसंघात मैत्रिपूर्ण लढत होणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.
भाऊसाहेब कांबळे यांचा अर्ज मागे घेऊ, असे मला स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. मी त्याबद्दल भाऊसाहेब कांबळे यांना सांगितले होते. मात्र नंतर काय झाले माहीत नाही.
अर्ज माघारीच्या दिवशी ते नॉटरिचेबल झाले. भाऊसाहेब कांबळे उभे राहणार असतील तर महायुतीच्या दोन उमेदवारांमध्ये मैत्रीपूर्ण लढत होईल.
मात्र जागा राष्ट्रवादीला सोडल्याचे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मला कळवण्यात आले होते. त्यामुळे कानडे हेच महायुतीचे अधिकृत उमेदवार असल्याचे मी जाहीर केले आहे.
मात्र मुख्यमंत्र्यांना वाटतं असेल की भाऊसाहेब कांबळे हेच त्यांचे उमेदवार आहेत. तर शेवटी मुख्यमंत्री राज्याचे नेते आहेत. त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार आहे.
त्यामुळे महायुतीला फटका बसेल असं मला वाटत नाही, दोन उमेदवार असले तरी जनता महायुती सोबत आहे, असं विखे पाटील यांनी म्हटलं आहे.