उमेदवारी दाखल करण्यासाठी शिंदेनी हेलिकॉप्टर पाठवलं; पण आता त्याच उमेदवाराला सोडलं वाऱ्यावर
Shinde sent helicopter to file nomination; But now the same candidate is left in the wind

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करायला अवघ्या काही तासांचा कालावधी असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुंबईहून दोन एबी फॉर्म पाठवले होते.
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन आमदारांविरोधात शिंदेंनी दोघांना तिकीट देत बंडखोरीला हवा दिली. देवळालीतून राष्ट्रवादीच्या सरोज अहिरे रिंगणात असताना शिंदेंनी राजश्री अहिरराव यांना तिकीट दिलं.
त्यांची उमेदवारी कायम असताना आता शिंदेंनी सरोज अहिरे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे राजश्री अहिरराव यांना शिंदेसेनेनं वाऱ्यावर सोडल्याची चर्चा आहे.
महायुतीत सीटिंग-गेटिंगचा फॉर्म्युला ठरलेला असल्यानं देवळालीची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेली. पक्षानं विद्यमान खासदार सरोज अहिरे यांना तिकीट दिलं.
पण या मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार म्हणून राजश्री अहिररावदेखील प्रचार करत आहेत. त्यामुळे महायुतीच्या अधिकृत उमेदवार नेमक्या कोण, असा प्रश्न मतदारांना पडला आहे.
अर्ज दाखल करण्यास काही तास राहिलेले असताना शिंदेसेनेनं राजश्री अहिरराव यांना उमेदवारी दिली. पण आता पक्षानं त्यांना वाऱ्यावर सोडलं आहे. शिवसेनेनं एक प्रसिद्धीपत्रक जारी केलं आहे.
शिंदेंच्या आदेशानं शिवसेना पक्षातर्फे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार विद्यमान आमदार सरोज अहिरेंना पाठिंबा जाहीर करण्यात येत असल्याचा उल्लेख प्रसिद्धीपत्रात आहे.
शिंदेसेनेच्या उमेदवार राजश्री अहिरराव यांनी राजकारणात पाऊल टाकण्यासाठी तहसीलदार पदावरुन स्वेच्छानिवृत्ती घेतली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री शिंदेंनी राजश्री अहिरराव
आणि धनराज महालेंना एबी फॉर्म पाठवले होते. हे फॉर्म हेलिकॉप्टरनं पाठवण्यात आले होते. पण त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हस्तक्षेप केला. मग शिंदेंनी अहिरराव आणि महालेंना अर्ज मागे घेण्याच्या सूचना केल्या होत्या.
पक्षानं सूचना दिल्यानंतरही अहिरराव यांनी माघार घेतली नव्हती. शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला होता. आता मतदान अवघ्या दोन दिवसांवर आलेलं असताना
शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरींनी एक पत्र व्हायरल केलं आहे. त्यात राजश्री अहिरराव यांना माघार घेण्याची सूचना केली होती. महायुतीत कोणताही विसंवाद असू नये
, त्याचा फटका महायुतीच्या उमेदवाराला बसू नये यासाठी अहिरराव यांना सेनेच्या कोणत्याही कार्यकर्त्यांनी सहकार्य करु नये, असं पत्रात नमूद करण्यात आलं आहे. पक्षाच्या निर्णयानं अहिररावांना मोठा धक्का बसला आहे