भाजपच्याच लोकांनी विनोद तावडेंचा गेम केला ? सनसनाटी दावा; राऊतांनी नेत्याचं नाव सांगितलं
BJP's own people played a game of jokes? sensational claim; Raut said the leader's name
मतदानाला अवघे काही तास राहिलेले असताना विरारमध्ये भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंवर पैसे वाटप केल्याचा आरोप झाला आहे.
बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर, त्यांचे पुत्र क्षितीज ठाकूर यांच्या कार्यकर्त्यांनी तावडेंना विरारच्या विवांता हॉटेलमध्ये रोखून धरलं.
तावडेंनी ५ कोटी रुपये वाटल्याचा आणि त्यांच्याकडे असलेल्या डायऱ्यांमध्ये १५ कोटी रुपयांची नोंद असल्याचा गंभीर आरोप ठाकूर यांच्याकडून करण्यात आलेला आहे.
बविआचे अध्यक्ष आणि आमदार हितेंद्र ठाकूर यांनी या प्रकरणात बोलताना मोठा गौप्यस्फोट केला आहे. विनोद तावडे विरारमध्ये येऊन ५ कोटी रुपये वाटणार असल्याची माहिती मला भाजपवाल्यांनी दिली होती.
पण इतका मोठा राष्ट्रीय स्तरावरचा नेता असं करणार नाही, असं मला वाटलं. पण तरीही आम्ही हॉटेलात पोहोचलो. तर इथे विनोद तावडे आणि पैसे दोन्ही सापडले, असं ठाकूर यांनी सांगितलं.
विनोद तावडेंनी ५ कोटी रुपये वाटले. त्यांच्याकडे असलेल्या डायऱ्यांमध्ये १५ कोटींची नोंद आहे. आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांना पकडल्यानंतर तावडेंचे मला २५ फोन आले.
हवं तर माझे कॉल रेकॉर्ड तपासा. माझी चूक झाली. मला जाऊ द्या, अशा शब्दांत त्यांनी माझ्याकडे गयावया केली, असा सनसनाटी दावा ठाकूरांनी केला.
मतदानाच्या ४८ तास आधी मतदारसंघ सोडायचा असतो, इतकी साधी गोष्ट तावडेंसारख्या मोठ्या नेत्याला समजत नाही का, असा सवाल त्यांनी केला.
भाजपमधल्या काही जणांनीच मला तावडे पैसे वाटण्यास येणार असल्याची माहिती दिली होती, असा खळबळजनक दावा हितेंद्र ठाकूर यांनी केला.
त्यानंतर आता शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणात सनसनाटी आरोप केला आहे. ‘भाजपचा राष्ट्रीय महासचिव अशा प्रकारे पैसे वाटताना पकडला जातो.
विनोद तावडे भविष्यात डोईजड होतील या भीतीमधून ही कारवाई करण्यात आली. गृहखात्यानं तावडे यांच्यावर पाळत ठेवली होती.
त्यानंतर त्यांना या सगळ्या प्रकरणात पद्धतशीरपणे अडकवण्यात आलं. तावडे बहुजन समाजातून येतात. एका बहुजन नेत्याला संपवण्यासाठी हा प्रकार घडवून आणण्यात आला,’ असा आरोप राऊत यांनी केला.
दरम्यान बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तावडेंना आज विरारच्या विवांता हॉटेलात गाठलं. त्यांच्या बॅगेत पैसे, डायऱ्या सापडल्या. त्यानंतर तब्बल सहा तास तणावपूर्ण परिस्थिती होती. आता या सगळ्यावर तावडेंनी स्पष्टीकरण दिलं आहे.
विनोद तावडे ५ कोटी रुपये वाटण्यासाठी येणार असल्याची माहिती भाजपच्याच नेत्यांनी दिली होती, असा दावा करत बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी एकच खळबळ उडवून दिली.
त्यावर तावडेंनी भाष्य केलं. ‘हितेंद्र ठाकूरांनी म्हटलं भाजप नेत्यानं टिप दिली. ते धादांत खोटं आहे. नंतर ते कारमध्ये बसल्यावर मला काय म्हणाले, तेदेखील मला माहीत आहे. त्यामुळे भाजप नेत्यानं टिप दिल्याच्या दाव्यात तथ्य नाही,’ असं तावडें पत्रकारांना सांगितलं.
तुमची टिप कोणी दिली असं तुम्हाला वाटतं, असा प्रश्न विचारताच तावडेंचा आवाज चढला. या प्रकरणात टिप देण्यासारखं काही नव्हतंच. मग टिपचा प्रश्न येतो कुठून असा उलटप्रश्न तावडेंनी केला.
केंद्रीय भाजपकडून काही संपर्क साधण्यात आला का, असा प्रश्न तावडेंना विचारण्यात आला. त्यावर कोणीही संपर्क साधलेला नाही. कोणी स्पष्टीकरण मागितलेलं नाही, असं तावडे म्हणाले.
तुम्ही मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असल्यानं हा प्रकार मुद्दाम घडवून आणण्यात आला का, असा सवाल तावडेंना विचारला गेला. त्यावर मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीबद्दल मी आधीच म्हटलंय ओन्ली राष्ट्र, नो महाराष्ट्र.
मी विरारला जाणार असल्याचं पक्षातल्या कोणालाच माहीत नव्हतं. त्यामुळे अडकवण्याचा विषय येतच नाही, असं तावडेंनी सांगितलं.
पैसे वाटप केल्याचा आरोप संपूर्णपणे चुकीचा असल्याचं तावडेंनी म्हटलं. ‘त्यांना (ठाकूर आणि बविआच्या कार्यकर्त्यांना) शंका आली असेल म्हणून त्यांनी केलं.
निवडणूक आयोगानं चौकशी करावी. या प्रकरणात तीन एफआयआर झाले आहेत. आम्ही दोघांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली, म्हणून एक एफआयआर झाला. मी मतदारसंघ नसताना तिकडे गेलो.
त्यामुळे दुसरा एफआयआर नोंदवला गेला आणि हितेंद्र ठाकूर मतदारसंघ नसताना तिकडे आले. या कारणामुळे तिसरा एफआयआर झाला.
पैशांचा एकही आरोप नाही. एफआयआर नाही. पैशांविषयीच्या बातम्या खोट्या आहेत. त्यात काहीच तथ्य नाही, असं तावडेंनी सांगितलं.