शिवसेना ठाकरे गटाचा संताप;सुशीलकुमार शिंदेनी भाजपशी हातमिळवणी केल्याचा आरोप
Anger of Shiv Sena Thackeray group; Sushil Kumar Shinde accused of joining hands with BJP
महाविकास आघाडीअंतर्गत शिवसेना उद्धव ठाकरे आणि काँग्रेस पक्षाने प्रतिष्ठेच्या केलेल्या सोलापूर दक्षिण मतदारसंघात महाविकास आघाडीने उतरविलेल्या शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या उमेदवाराविरुद्ध काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे
आणि त्यांच्या कन्या खासदार प्रणिती शिंदे यांनी अखेर बंडखोर उमेदवार धर्मराज काडादी यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होऊन शिंदे पिता-पुत्रीच्या या भूमिकेबद्दल शिवसेनेने संताप व्यक्त केला आहे.
सोलापूर दक्षिणच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये सुरुवातीपासून वाद सुरू होता. काँग्रेस या जागेसाठी अखेरपर्यंत आग्रही होती. मात्र जागा वाटपात अखेर ही जागा शिवसेनेकडे (उद्धव ठाकरे) गेली. यानंतर प्रत्यक्ष प्रचार सुरू असतानाही यावरून महाविकास आघाडीत खटके उडाले.
पुढे तर याचे पडसाद संपूर्ण जिल्ह्यात उमटत महाविकास आघाडीत बिघाडी होण्यात झाले. सोलापूर दक्षिण, सोलापूर मध्य, सांगोला अशा मतदारसंघांत काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये सुरुवातीला असलेला विसंवाद पुढे एकमेकांवर चिखलफेक करण्यापर्यंत गेला.
याबाबत सोलापुरात उद्धव ठाकरे प्रचारासाठी आले असता त्यांनीही सभेत जाहीरपणे याबाबत काँग्रेस आणि सुशीलकुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांना आघाडीचा धर्म पाळण्याची आठवण करून देत एकप्रकारे इशाराच दिला होता.
परंतु शिंदे कुटुंबीय, काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते अखेरपर्यंत आघाडीच्या प्रचारात सहभागी झाले नाही. या सर्वांत टोक आज गाठले गेले.
मतदानाच्या दिवशी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि त्यांच्या कन्या खासदार प्रणिती शिंदे यांनी बंडखोर उमेदवार धर्मराज काडादी यांना पाठिंबा जाहीर करत तसे मतदान करण्यास सांगितले.
त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये अगोदरच बिघडलेले वातावरण आणखी बिघडत शिंदे पिता-पुत्रीच्या या भूमिकेबद्दल ठाकरे गटाने याबद्दल संताप व्यक्त केला.
मागील २०१४ आणि २०१९ च्या दोन्ही निवडणुकांत भाजपने ही जागा जिंकली असली तरी दोन्ही वेळा काँग्रेस पक्षाचा उमेदवार द्वितीय स्थानावर राहिला आहे.
परंतु शिवसेनेने गडबड करून ही जागा स्वतःकडे घेऊन केलेली चूक आपण त्यांच्या निदर्शनास आणून दिल्याचे सुशीलकुमार शिंदे यांनी पाठिंबा जाहीर करताना सांगितले.
सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे प्रमुख धर्मराज काडादी हे सुसंस्कृत, शांत, सर्वांना सोबत घेऊन जाणारे नेते आहेत. त्यांना चांगले भवितव्य आहे,
अशा शब्दांत शिंदे यांनी त्यांच्या उमेदवारीचे समर्थन केले. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील मोहिते पाटील यांचा अपवाद वगळता अन्य सर्व काँग्रेस नेते काडादी यांच्या प्रचारात गुंतले होते.
दरम्यान, सुशीलकुमार शिंदे आणि त्यांच्या कन्या खासदार प्रणिती शिंदे यांनी आघाडीचा धर्म बाजूला ठेवून अपक्ष धर्मराज काडादी यांना पाठिंबा देऊन शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचा केसाने गळा कापण्याची प्रतिक्रिया
या पक्षाचे उपनेते शरद कोळी यांनी व्यक्त केली आहे. शिंदे कुटुंबीयांची भाजपशी आतून हातमिळवणी झाली आहे. काँग्रेस हीच आता भाजपची ‘बी टीम’ झाल्याची टीका ठाकरे गटाने केली.