एकनाथ शिंदेंनी घेतली मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतूनची माघार, भाजपचा मार्ग मोकळा?
Eknath Shinde withdraws from the Chief Ministerial race, clears the way for BJP?
राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या भव्यदिव्य यशानंतर महायुतीचा मुख्यमंत्री कोण, याची चर्चा रंगली आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यापैकी कोण मुख्यमंत्री होणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
यंदाच्या निवडणुकीत भाजपने एकहाती 132 जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हावेत, असा आग्रह भाजप समर्थकांनी धरला होता.
मात्र, एकनाथ शिंदे यांनीही आक्रमक भूमिका घेत मुख्यमंत्रिपदावर दावा ठोकल्याची चर्चा होती. शिंदे गटाच्या नेत्यांकडून तशाप्रकारची विधाने केली जात होती.
मात्र, दिल्लीतील भाजप नेतृत्त्वाने एकनाथ शिंदे यांना देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील, असा स्पष्ट संदेश दिल्याची माहिती आहे.
त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून आपल्या मुख्यमंत्रिपदासाठी वेगवेगळ्या स्तरावर वातावरणनिर्मिती करणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी एक पाऊल मागे घेतल्याचे सांगितले जात आहे.
महायुतीच्या यशात एकनाथ शिंदे यांचे कशाप्रकारे योगदान आहे, ते कशाप्रकारे लोकांच्या मनातील मुख्यमंत्री आहेत, या गोष्टी शिंदे समर्थकांकडून भाजपश्रेष्ठींच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न सुरु होता.
राज्यातील काही संघटनांकडून देवळांमध्ये एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रिपदासाठी अभिषेक आणि प्रार्थना करण्यात आल्या होत्या. याशिवाय, सोशल मीडियावर एकनाथ शिंदे यांच्या लोकप्रियतेचे गोडवे गाणाऱ्या पोस्ट व्हायरल झाल्या होत्या.
महायुतीच्या यशात आपलेही योगदान आहे. त्यामुळे किमान अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद आपल्याकडे राहावे, असा एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न होता.
मात्र, भाजप नेतृत्वाकडून पुन्हा मुख्यमंत्रिपद मिळणार नाही, हे स्पष्ट केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी शर्यतीतून माघार घेतल्याचे सांगितले जाते.
एकनाथ शिंदे यांच्याकडून मुख्यमंत्रिपदासाठी दबावाचे राजकारण सुरु असताना भाजपच्या नेत्यांकडून ठामपणे भूमिका व्यक्त करण्यात आली होती.
भाजपने शिंदे गटाला मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला नव्हता, असे रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट केले होते. तर रिपाई प्रमुख रामदास आठवले यांनी तर देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री करावे,
एकनाथ शिंदे यांनी केंद्रात यावे, असे जाहीर वक्तव्य केले होते. भाजपने शिंदे गटाला मुख्यमंत्रीपद मिळणार नाही, हा निर्णय कळवल्याचेही आठवले यांनी सांगितले होते.
भाजप नेतृत्वाकडून आलेला संदेश आणि रामदास आठवले यांनी जाहीरपणे केलेले वक्तव्य यानंतर कोणत्याही परिस्थितीत आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळणार नाही, हे स्पष्ट झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी या शर्यतीतून माघार घेतल्याचे सांगितले जाते.
आधी तावातावाने मुख्यमंत्रिपदावर दावा सांगणाऱ्या शिंदे गटाच्या प्रवक्त्यांची भूमिका मंगळवारी काहीशी मवाळ होताना दिसली. दीपक केसरकर यांनी भाजप नेतृत्त्वाचा निर्णय मान्य असल्याचे सांगत सपशेल लोटांगण घातले.
प्रत्येक पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांना आपल्याच पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा, हे वाटणे स्वाभाविक आहे. पण मुख्यमंत्रीपदाबाबत भाजपचे नेतृत्व निर्णय घेईल, असे वक्तव्य केसरकर यांनी केले.