आता राहुल गांधींची EVM हटाव यात्रा
Now Rahul Gandhi's EVM removal journey

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेला देशभरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. याच धर्तीवर आता मतपत्रिकेवर
निवडणुका व्हाव्यात या मागणीसाठी राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली यात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.
त्याचप्रमाणे मतपत्रिकांवर निवडणुकांसाठी जनतेच्या स्वाक्षऱ्यांचे लाखो अर्ज राष्ट्रपती, पंतप्रधान, सरन्यायाधीश व निवडणूक आयोगाला पाठवले जाणार असल्याची माहिती
नाना पटोले यांनी बुधवारी दिली. मुंबईतील टिळक भवन येथे पार पडलेल्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
महाराष्ट्र विधानसभेच्या निकालावर कोणाचाही विश्वास बसत नाही. या निकालात काहीतरी गडबड असल्याची भावना सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे. संविधानाने सर्वांना मतदानाचा अधिकार दिलेला आहे,
पण आपण एकाला दिलेले मत दुसऱ्यालाच जात असल्याची भावना जनतेत आहे. मतपत्रिकेवर निवडणुका घेण्यासाठी जनआंदोलन उभे करण्याची घोषणा
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी संविधानदिनी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात केली आहे. महाराष्ट्रात लवकरच या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम सुरू केली जाईल.
राहुल गांधींच्या यात्रेलाही महाराष्ट्रात प्रचंड प्रतिसाद मिळेल, असे नाना पटोले म्हणाले. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस कार्यकारिणीचे सदस्य बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार आदी उपस्थित होते.
भाजप महायुतीला पाशवी बहुमत मिळाले असूनही चार दिवस झाले तरी मुख्यमंत्री निश्चित होत नाही आणि सरकारही स्थापन होत नाही.
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण याचा निर्णय जोपर्यंत ‘मित्र’ घेत नाही तोपर्यंत सरकार व मुख्यमंत्री होणार नाही. अडीच वर्षात निम्मी मुंबई व महाराष्ट्र मित्राला विकला आहे,
यापुढेही महाराष्ट्र विकण्याचे काम हे सरकार करेल, त्यामुळे ‘मित्राचा’ आदेश येताच मुख्यमंत्री व सरकार बनेल असे पटोले म्हणाले.