दिल्लीत शाहांसोबत बैठकीत मुख्यमंत्रीपद फायनल ; पण तो एक प्रश्न अजूनही अनुत्तरित

CM post finalised in meeting with Shah in Delhi; But one question remains unanswered

 

 

 

सत्तास्थापना आणि मुख्यमंत्रिपदासंदर्भात काल रात्री दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी महायुतीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक झाली. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार

 

आणि देवेंद्र फडणवीस या बैठकीला उपस्थित होते. बैठकीत मुख्यमंत्रिपदासह खातेवाटपाबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. काल दिल्लीत झालेल्या महायुतीच्या बैठकीत भाजपचाच मुख्यमंत्री होणार हे ठरलं आहे अशी खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे.

 

दरम्यान महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणविसांचं नाव जवळपास निश्चित असल्याची माहिती देखील आहे. यासाठीच्या सर्व प्रक्रिया लवकरच पार पडून औपचारिक घोषणा करण्यात येईल, अशी माहिती समोर येत आहे.

 

एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणार की नाही, यावर अजून प्रश्नचिन्ह आहे. उपमुख्यमंत्रिपदाचा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. आज मुंबईत पुन्हा एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात बैठक होणार आहे.

 

या बैठकीत उपमुख्यमंत्रिपदाबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणार नाही, अशी चर्चा रंगली होती. अमित शाह

 

आणि जेपी नड्डा यांच्यासोबतच्या दिल्लीतील बैठकीनंतर देखील एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणार की नाही, यावर अद्याप उत्तर मिळालेलं नाही.

राज्यातल्या नव्या महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपद मिळाल्यास एकनाथ शिंदेंनी ते स्वीकारावं अशी गळ शिवसेनेच्या नेत्यांनी त्यांना घातल्याची माहिती आहे.

 

एकनाथ शिंदेंची ठाण्यातली पत्रकार परिषद झाल्यानंतर अनेक नेत्यांनी शिंदेंना तशी विनंती केल्याचं समजतं. काल दिल्लीला रवाना होण्यापूर्वी शिंदेंची शिवसेनेच्या काही नेत्यांसोबत बैठक झाली.

 

आपण सत्तेत राहूनच सरकार चालवावं असा सूर शिवसेनेच्या नेत्यांनी शिंदेंसोबतच्या बैठकीत आळवला. त्यामुळं शिंदे नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार का?, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

आता कालच्या बैठकीनंतर सत्तास्थापना नाट्याचा दुसरा अंक आज मुंबईत रंगणार आहे. महायुतीच्या तीनही नेत्यांची आज पुन्हा मुंबईत बैठक होणार आहे. अमित शाहांनी केलेल्या सूचना

 

आणि निर्णयांबद्दल आजच्या बैठकीत चर्चा होईल. येत्या दोन दिवसांत महाराष्ट्रात निरीक्षक येणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री कोण होणार, शपथविधी कधी होणार हे चित्र लवकरच स्पष्ट होईल.

 

शिवसेना आणि राष्ट्रवादीला केंद्रीय मंत्रिपदाची लॉटरी लागणार असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीत सुनील तटकरे किंवा प्रफुल्ल पटेल,तर शिवसेनेच्या श्रीकांत शिंदेंच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *