उमेदवार म्हणाला माझ्या समाजाचे 600 मतदान, पण मतं पडली फक्त ९
The candidate said that my community had 600 votes, but only 9 votes were cast.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत उत्तर सोलापूर मतदारसंघाच्या निकालानंतर पराभूत उमेदवारांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार प्रशांत इंगळे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या समाजाचे देखील मला मतदान पडत नाही, म्हणजे काहीतरी संशयास्पद आहे, अशी शंका त्यांनी व्यक्त केली.
एका बुथमध्ये माझ्या समाजाचे सहाशे मतदान होते, त्या ठिकाणी मी तीनशे मतं पडतील असा अंदाज बांधला होता, पण मला फक्त नऊ मतं पडली आहेत, अशी प्रतिक्रिया प्रशांत इंगळे यांनी दिली.
प्रशांत इंगळे यांनी सोलापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून अधिकृतरित्या उमेदवारी अर्ज भरला होता. प्रशांत इंगळे यांना एकूण मतदानापैकी फक्त ११५५ मतं मिळाली आहेत.
येथून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विजयकुमार देशमुख हे विजयी झाले आहेत. विजयकुमार देशमुख यांना १ लाख १७ हजार २१५ मतं पडली आहेत.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे महेश कोठे यांना ६२ हजार ६३२ मतं मिळाली आहेत. महेश कोठे यांनी सुद्धा संपूर्ण मतमोजणी प्रक्रियेवर संशय व्यक्त केला होता.
सोलापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात भाजपचे विजयकुमार देशमुख हे पाचव्यांदा निवडून आले आहेत. निवडणुकांच्या अगोदर भाजप आणि विजयकुमार देशमुख यांना मतदारसंघातून मोठा विरोध होता.
आपण निवडून येऊ की नाही, याबाबत विजयकुमार देशमुख यांना स्वतःलाच संशय होता. ज्यावेळी मतमोजणी झाली त्यावेळी
भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजयकुमार देशमुख यांना विश्वास बसत नव्हता. ते स्वप्नात होते की काय अशी परिस्थिती होती, त्यांनी स्वतःला चिमटा घेतला असेल अशी प्रतिक्रिया मनसेचे पराभूत उमेदवार प्रशांत इंगळे यांनी दिली आहे.
मनसे प्रमुख राज ठाकरेंनी राज्यातील सर्वच मनसे नेत्यांसोबत बैठक घेतली आहे. त्याबाबत बोलताना प्रशांत इंगळे यांनी सांगितले, आम्ही जनतेतील आहोत, आमचा पक्ष रस्त्यावरचा आणि जनतेतील पक्ष आहे.
पराभवामुळे आम्ही खचणार नाही, पुन्हा एकदा जोमाने लढणार. सोलापुरात मनसे किंगमेकर ठरणार असे मनसेच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.