केजरीवालांचा काँग्रेसला धक्का,घेतला मोठा निर्णय
Kejriwal's big decision shocks Congress

हरियाणा व महाराष्ट्रात काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर आम आदमी पार्टी सतर्क झाली आहे. अशातच या पक्षाने दिल्लीची आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी निवडणुकीआधी ‘एकला चलो रे’चा नारा दिला आहे. त्यांनी रविवारी (१ डिसेंबर) दुपारी पत्रकार परिषद घेऊन त्यांचा निर्णय जाहीर केला.
केजरीवाल म्हणाले, “आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टी कोणत्याही पक्षाबरोबर आघाडी करणार नाही. आमच्या पक्षाने ही निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे”.
अरविंद केजरीवाल यांनी आतापर्यंत आघाडीबाबत ठाम भूमिका मांडली नव्हती. मात्र, हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीनंतर आपने कोणत्याही पक्षाशी युती अथवा आघाडी न करण्याचा सूर आळवला होता. त्यावर आज शिक्कामोर्तब झालं.
काँग्रेसने हरियाणात आम आदमी पार्टीला बरोबर घेतलं नव्हतं. तसेच त्या निवडणुकीत काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला होता. पाठोपाठ महाराष्ट्रात काँग्रेसने शिवसेना (ठाकरे) व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)
या दोन मोठ्या पक्षांशी आघाडी केली होती. तरीदेखील महाराष्ट्रात काँग्रेसला केवळ १६ जागा जिंकता आल्या. दोन राज्यांमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर आता आम आदमी पार्टीने काँग्रेसबरोबर
आघाडी न करण्याचा निर्णय घेतला आहे. केजरीवाल यांच्या पक्षाने दिल्लीची विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे. केजरीवालांच्या या निर्णयामुळे दिल्लीत पुन्हा एकदा आप, भाजपा व काँग्रेसमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.
आपने लोकसभा निवडणुकीत काँग्रेसशी आघाडी केली होती. मात्र त्या निवडणुकीत त्यांना फायदा झाला नाही, असं आप नेत्यांनी जाहीरपणे बोलून दाखवलं होतं.
तर, हरियाणात सत्ता मिळण्याची शक्यता दिसू लागल्यावर काँग्रेसने या राज्यात मित्रपक्षांना बरोबर घेतलं नाही. सुरुवातीला आप व काँग्रेसमध्ये आघाडी करण्याबाबत
व जागावाटपावर चर्चा झाली. मात्र आपला काँग्रेसने अधिक जागा देण्यास नकार दिल्यानंतर तिथे आघाडी होऊ शकली नाही. परिणामी दोन्ही पक्ष वेगवेगळे लढले. या राज्यात काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला.
दरम्यान, आपने दिल्लीची विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे. आप नेत्यांनी हरियाणाच्या निवडणुकीवेळीच याबाबतचे संकेत दिले होते. पक्ष प्रमुखांनी आज त्यावर शिक्कामोर्तब केलं.