परभणीतील हिंसक घटनेवरून ५० जणांना अटक
50 people arrested in Parbhani violent protest case
तणावपूर्ण परिस्थितीनंतर आज परभणी शहरातले वातावरण निवळले असून जनजीवन पूर्वपदावर आले आहे. दरम्यान गेल्या दोन दिवसातील घटनांमध्ये शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात एकूण आठ गुन्ह्यांची नोंद झाली.
एकूण ५० जणांना अटक करण्यात आल्याची माहिती नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी माध्यमांना दिली.
विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनीही परभणी येथे जाऊन जिल्हाधिकारी व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यालगत असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीचा अवमान झाल्याची घटना मंगळवारी (दि.१०) सायंकाळच्या सुमारास घडली.
या प्रकरणात तात्काळ संबंधित आरोपीला पोलिसांनी अटक केली घटनेनंतर त्याच दिवशी सायंकाळी उशिरा मोठा जमाव पुतळा परिसरात दाखल झाला.
काही दगडफेकीच्याही घटना घडल्या.घटनेच्या दुसऱ्या दिवशी बंद पुकारण्यात आला होता. या बंदला हिंसक वळण लागले. घटनेच्या दुसऱ्या दिवशी संतप्त झालेल्या जमावाने शहरातल्या बाजारपेठेत घुसून मोठ्या प्रमाणात तोडफोड केली.
ज्या इसमाने संविधानाच्या प्रतिकृतीचा अवमान केला त्याच्याविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्यासह आता एकूण आठ गुन्हे या प्रकरणात दाखल झाले आहेत. बंद दरम्यान तोडफोड व जाळपोळ करणाऱ्या घटनांमध्येही गुन्ह्याची नोंद झाली आहे.
आतापर्यंत एकूण 50 जणांना अटक करण्यात आली आहे. यात ४१ पुरुष व नऊ महिलांचा समावेश आहे. शहरातील दुकानांचे फलक नासधूस करणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे अशा विविध कलमाखाली हे गुन्हे दाखल झाले आहेत.
पोलिसांकडे जसजसे या घटनांमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज उपलब्ध होत आहे त्यानुसार संबंधितांची कसून चौकशी केली जात आहे.
पोलीस संबंधित व्यक्तींना हस्तगत करत असून जे दोषी निष्पन्न होतील त्या सर्वांच्या विरोधात कारवाई केली जाईल असेही उमप यांनी स्पष्ट केले. पोलीस हे वस्त्यांमध्ये घुसून आंदोलकांना लक्ष्य आहेत.
‘कोंबिंग ऑपरेशन’ सुरू आहे या काही नेत्यांनी केलेल्या आरोपांचा उमाप यांनी इन्कार केला. परिस्थिती नियंत्रणात आणताना काही लोकांची धरपकड करण्यात आलेली आहे.
पोलिसांकडून कोणतेही ‘कोंबिंग ऑपरेशन’ करण्यात आले नाही, असे ते म्हणाले. सुरुवातीला परिस्थिती हाताळण्यात पोलीस यंत्रणेला अपयश आले का या प्रश्नावर उमाप यांनी घटनेची व्याप्ती वाढल्यानंतर पोलिसांना
अनेक ठिकाणी जावे लागले त्यामुळे काही अवधी लागला असला तरी आता परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले. एका पोलीस उपअधीक्षकासह नऊ पोलीस अंमलदार या प्रकरणात किरकोळ जखमी झाल्याचेही ते म्हणाले.
दरम्यान संविधानाच्या प्रतिकृतीचा अवमान करणाऱ्या आरोपीला अटक झाल्यानंतर यामागे सूत्रधार कोण आहे किंवा यात काही कट आहे का या बाबी तपासानंतरच स्पष्ट होतील असेही ते म्हणाले.