सत्कार कार्यक्रमात वीज गेली;खासदारांनी दिला “हा” इशारा कि लगेच लाईट आली
Electricity went out during the felicitation program; Khasdars gave a "ha" warning that the lights came on immediately
अहमदनगर चे नवनिर्वाचित खासदार नीलेश लंके यांचे सध्या ठिकठिकाणी सत्कार समारंभ सुरू आहेत. नगरच्या केडगाव उपनगरात मंगळवारी रात्री असाच एक कार्यक्रम सुरू होता.
तेवढ्यात वीज पुरवठा खंडित झाला. यावर नागरिकांनी तक्रार केली की, तुमचा कार्यक्रम सुरू असताना जाणीवपूर्वक वीज पुरवठा खंडित केला जातो.
त्यावर खासदार लंके यांनी लगेच वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना फोन केला. तुम्ही कोणाच्या दबावाखाली काम करीत आहात? नेमक्या माझ्याच कार्यक्रमाच्यावेळी वीज पुरवठा का खंडित होतो?
जर पाच मिनिटांत वीज पुरवठा सुरळीत झाला नाही, तर तुमच्या कार्यालयात येऊन हा कार्यक्रम घेऊ असा सज्जड इशारा खासदार लंके यांनी अधिकाऱ्यांना दिला. त्यानंतर खरोखरच पाच मिनिटांत वीज पुरवठा सुरळीत झाला आणि उपस्थितांनी जल्लोष केला.
केडगाव मधील सर्वपक्षीय व ग्रामस्थांच्या वतीने हा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. सुरवातीला खासदार लंके यांनी केडगावच्या रेणुका मातेच्या मंदिरात आरती केली.
त्यानंतर केडगाव देवी मंदीर ते केडगाव वेशीपर्यंत मिरवणूक काढण्यात आली. केडगावच्या ऐतिहासिक वेशीत सभा आयोजित करण्यात आली होती. सभा सुरू असताना अचानक वीज पुरवठा खंडित झाला.
यावेळी उपस्थित व पदाधिकाऱ्यांनी खासदार लंके यांना सांगितले की, आम्हाला हे अपेक्षितच होते. ज्या ज्या वेळी आम्ही कार्यक्रम घेतो त्यावेळी वीज पुरवठा खंडित होतो.
निवडणुकीच्या प्रचार काळातही असेच होत होते. यावर खासदार लंके यांनी लगेच वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना फोन केला. त्यांना चांगले फैलावर घेतले.
मी ज्यावेळी प्रचाराला गेलो, तेव्हाही तेथील वीज पुरवठा खंडित केला जात होता. आता जनतेने माझा विजयोत्सव आयोजित केला आहे, तरीही वीज गेली.
आपण अधिकारी कोणाच्या दबावाखाली काम करीत आहात का? जर पाच मिनिटांत वीज आली नाही, तर आम्ही हा कार्यक्रम तुमच्या कार्यालयात येऊन साजरा करू, असा इशारा देत खासदार लंके यांनी फोन बंद केला.
तोपर्यंत ग्रामस्थांनी मोबाईलच्या फ्लॅश लाइट सुरू केल्या होत्या. त्यानंतर अवघ्या पाच मिनिटांत वीज पुरवठा सुरू झाला. त्यावर उपस्थितांनी जल्लोष केला.
या कार्यक्रमात बोलताना खासदार लंके म्हणाले, जनतेने मला जनसेवक म्हणून संधी दिली आहे. जनतेने माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवारास खासदार पदासाठी निवडून दिले आहे.
जनतेचा हा जनसेवक आपल्या पदाचा वापर ज्यांनी निवडणुकीत दगा दिला किंवा विरोधी पक्षात गेले, किंवा निवडणुकी दरम्यान विरोधी उमेदवाराबरोबर शाब्दिक हेवेदेवे झाले असतील ते सर्व मी निकालानंतर विसरून गेलो आहे.
आता खासदारकीचा वापर फक्त जनसेवक या नात्याने जनतेच्या कामासाठीच केला जाईल, असे खासदार लंके म्हणाले.
शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते माजी महापौर अभिषेक कळमकर, माजीनगरसेवक विजय पठारे, माजी नगरसेवक योगिराज गाडे, पेन्शनर्स असोसिएशनचे मनोज संग्राम कोतकर, हर्षवर्धन कोतकर, अजय आजबे, कार्तिक सातपुते, संजय मुनोत यांचीही भाषणे झाली.