नाराज भुजबळांचे राष्ट्रवादी सोडण्याचे संकेत म्हणाले “जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं रहना”

Disgruntled Bhujbal's signal to leave the nationalists said "Jahan nahi chaina, aha nahi rahna"

 

 

 

महायुती सरकारचा विस्तार नुकताच पार पडला आहे. मात्र या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार) आणि महाराष्ट्रातील ओबीसींचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना स्थान दिलेलं नाही.

 

त्यामुळे भुजबळांच्या समर्थकांना धक्का बसला आहे. पक्षातील वरिष्ठांनी व महायुतीच्या नेत्यांनी मंत्रिपदापासून वंचित ठेवल्यामुळे छगन भुजबळ नाराज आहेत.

 

भुजबळांनी त्यांची नाराजी प्रसारमाध्यमांसमोर व्यक्त केली आहे. तसेच त्यांना पुढच्या भूमिकेबाबत प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी एक सूचक वक्तव्य केलं आहे.

 

ज्यामुळे राज्याच्या राजकारणात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. नाराज भुजबळांना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलं की तुम्ही आता नागपूरमधील विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात सहभागी होणार नाही का?

 

पक्षाने डावलल्यानंतर तुमची आता पुढची भूमिका काय असेल? यावर भुजबळ म्हणाले, “आता बघू… जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं रहना”.

 

छगन भुजबळ म्हणाले, “मंत्रिमंडळातून मला का काढलं याबाबत मला माहिती नाही. परंतु, सात-आठ दिवसांपूर्वी माझं वरिष्ठांशी बोलणं झालं होतं. त्यावेळी ते (अजित पवार आणि इतर) मला म्हणाले,

 

तुम्हाला राज्यसभेवर जायचं असेल तर आम्ही तुम्हाला राज्यसभेवर पाठवू. मी त्यांना म्हणालो, जेव्हा मला राज्यसभेवर जायचं होतं तेव्हा तुम्ही मला ती संधी दिली नाही.

 

तेव्हा तुम्ही मला सांगितलं की विधानसभेची निवडणूक लढवा. तुम्ही विधानसभा निवडणूक लढवलीच पाहिजे. तुमच्याशिवाय येवला मतदारसंघाची निवडणूक जिंकता येणार नाही.

 

तुम्ही लढत असाल तर पक्षाला जोम येईल. पक्ष व कार्यकर्ते राज्यभर जोमाने काम करतील. त्यामुळे तुम्ही लढलंच पाहिजे, असं मला सांगितलंत.

 

तुमच्या त्या सल्ल्यानंतर मी विधानसभा निवडणूक लढवली. येवल्यातील जनतेने मला मोठा आशीर्वाद देत निवडून दिलं. आता मी तुमच्या सांगण्यावरून आमदारकीचा राजीनामा देऊ शकत नाही. तसं केल्यास माझ्या मतदारसंघातील जनतेची प्रतारणा होईल.

 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वरिष्ठ नेते छगन भुजबळ म्हणाले, “राज्यसभेवर जाण्यासाठी मला विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागेल.

 

मी तसं केल्यास माझ्या लोकांसाठी ते दुःखदायक असेल. माझे मतदार रागावणार नाहीत, परंतु निश्चितपणे त्यांच्या मतांची प्रतारणा होईल, जे मी करू शकत नाही. ज्यांनी माझ्यावर जीवापाड प्रेम केलं त्या लोकांशी मी असं वागणार नाही.

 

 

आठ दिवसांपूर्वी माझ्या वरिष्ठांनी मला की ऑफर दिली होती. परंतु, मी त्यांना स्पष्टपणे नकार कळवला आहे. मी आमदारकीचा राजीनामा देऊ शकत नाही,

 

असं त्यांना स्पष्टपणे सांगितलं आहे. कारण माझा राजीनामा देणं म्हणजे मतदारांचा विश्वासघात ठरेल. त्यामुळे मी सध्या तरी राजीनामा देणार नाही. एक दोन वर्षांनी त्याबाबत विचार करू.

 

मंत्रिपदापासून वंचित ठेवल्यामुळे छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चा कालपासून रंगत होत्या. अखेर आज (१६ डिसेंबर) त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर येऊन त्यांची नाराजी उघड केली. भुजबळ म्हणाले, “मी नाराज आहे. पुढे काय? ज्यांनी मला डावललं त्यांना तुम्ही (प्रसारमाध्यमं) प्रश्न विचारायला हवेत”.

 

छगन भुजबळ यांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी त्यांना विचारण्यात आलं की तुम्हाला पक्षाने, महायुतीतील नेत्यांनी मंत्रिपदापासून का डावललं? त्यावर भुजबळ म्हणाले, “मी एक सामान्य कार्यकर्ता आहे.

 

मला डावललं काय नि फेकलं काय… कोणाला काय फरक पडतो. आयुष्यात मंत्रिपद किती वेळा आलं आणि किती वेळा गेलं, परंतु हा छगन भुजबळ संपला नाही. तुम्ही मंत्रिपदावरून मला प्रश्न विचारण्याऐवजी ज्यांनी डावललं त्यांना विचारायला हवं”.

 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, अजित पवारांच्या अभिनंदनाचे, नव्या मंत्र्यांच्या अभिनंदनाचे होर्डिंग ठिकठिकाणी लागले आहेत. त्यावर भुजबळांचा फोटो छापलेला नाही.

 

त्यावरून भुजबळांना प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले, “कधी कधी होर्डिंगवर जागा नसते”. दरम्यान, त्यांना विचारण्यात आलं की तुम्ही पक्षावर नाराज आहात का? यावर भुजबळ म्हणाले,

 

“होय, मी नाराज आहे. पुढे काय करणार? मी पुन्हा सांगतो मी नाराज आहे”. यावर त्यांना विचारण्यात आलं की तुमचं अजित पवार (पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष), सुनील तटकरे (पक्षाचे प्रदेशाध्यक्ष) यांच्याशी काही बोलणं झालं आहे? यावर भुजबळ म्हणाले, “मला त्याची काही आवश्यकता वाटली नाही”.

मंत्रिपदापासून वंचित ठेवल्यानंतर आता पुढची भूमिका काय असेल? असा प्रश्न विचारल्यानंतर भुजबळ म्हणाले, “मी माझ्या लोकांशी बोलेन,

 

माझ्या मतदारसंघातील जनतेशी, माझ्या कार्यकर्त्यांशी, समात परिषदेतील लोकांशी बोलून पुढची भूमिका ठरवेन”. माध्यमांच्या प्रतिनिधींनी भुजबळांना

 

आता शरद पवारांकडे जाणार का? असा प्रश्न देखील यावेळी विचारला, त्यावर ते म्हणाले, “मी १२ डिसेंबर रोजी शरद पवारांना भेटून आलो आहे”.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *