मुंबईतील रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी, ९ जखमी, दोघांची प्रकृती गंभीर
A stampede at the railway station in Mumbai, 9 injured, two in critical condition
मुंबईमधील वांद्रे रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाल्याची माहिती समोर आली आहे. या चेंगराचेंगरीमध्ये ९ प्रवासी जखमी झाले आहेत.
तसेच यातील दोण जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती सांगण्यात आली आहे. जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
वांद्रे रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर पहाटे ५ वाजताच्या सुमारास ही घटना घडली असल्याची माहिती सांगण्यात येत आहे. रेल्वेत चढण्यासाठी प्रवाशांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
रेल्वेत चढत असतानाच झालेल्या गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाली आणि यामध्ये काही प्रवाशी प्लॅटफॉर्मवर पडले. त्यामुळे चेंगराचेंगरी होऊन ९ प्रवासी जखमी झाले आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार, वांद्रे ते गोरखपूर या रेल्वेने प्रवास करण्यासाठी प्रवाशांनी मोठी गर्दी केली होती. मात्र, वांद्रे ते गोरखपूर ही या गाडीला थोडा उशीर झाला होता.
त्यामुळे रेल्वे आल्यानंतर प्रवाशांनी रेल्वेत चढण्यासाठी मोठी गर्दी केली आणि या गर्दीमुळे चेंगराचेंगरीची घटना घडली. या चेंगराचेंगरी दरम्यान काही प्रवाशी प्लॅटफॉर्मवर पडले आणि त्यामध्ये ते जखमी झाले.
यानंतर त्यांना रेल्वे प्रशासनाकडून तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. मात्र, यातील दोन प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सांगण्यात येत आहे.
दरम्यान, या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना गर्दी न करण्याचं आणि रेल्वेत चढत असताना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
दरम्यान, या वांद्रे ते गोरखपूर या रेल्वेने प्रवास करण्यासाठी गर्दी केलेले बहुतांश प्रवाशी हे छट पुजेसाठी उत्तर प्रदेशात आपल्या गावी जात होते, अशी प्राथमिक माहिती सांगितली जात आहे.
यावर अद्याप रेल्वे प्रशासनाची अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. सध्या वांद्रे स्थानकातील प्लॅटफॉर्म परिस्थिती व्यवस्थित असून प्लॅटफॉर्मवर पोलीस उपस्थित असल्याची माहिती देण्यात येत आहे.
“गेल्या काही महिन्यांत रेल्वेच्या झालेल्या अपघातांची चौकशी रेल्वे विभागाने केली पाहिजे. केंद्रीय रेल्वे मंत्री हे रेल्वे प्रवाशांच्या समस्यांकडे आणि प्रवाशांना होणाऱ्या त्रासाकडे कायम दुर्लक्ष करत आहेत.
केंद्र सरकार सध्या सर्व खासगीकरण करत आहे. रेल्वे विभागातील अधिकारी हे प्रवाशांबरोबर व्यवस्थित वागत देखील नाहीत.
उर्मट भाषा बोलतात पण त्यांना अभय कोणाचं आहे? रेल्वे प्रशासनाकडे गाड्यांची सख्या वाढण्याची मागणी केली तरी ते देत नाहीत”, असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी रेल्वे प्रशासनावर प्रश्न उपस्थित केले.