स्वतःच्याच आमदाराला भाजपने बजावली कारणे दाखवा नोटीस,काय घडले कारण ?
BJP issued a show cause notice to its own MLA, what happened and why?

विधान परिषद आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना भाजपकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघातील भाजपचे पराभूत उमेदवार राम सातपुते यांनी
रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. विधानसभा निवडणुकीत रणजितसिंह मोहिते पाटील यांनी पक्षविरोधी काम केल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. सात दिवसात लेखी उत्तर देण्याची सूचना रणजितसिंह मोहिते पाटील यांना पक्षाने केली आहे.
आपण भारतीय जनता पार्टीचे जबाबदार प्रतिनिधी असूनही पक्षशिस्त भंग करणारे कृत्य वारंवार केल्याचे निदर्शनास आले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी,
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी प्रचारासाठी माळशिरस येथे आले असता सदर कार्यक्रमास आपली अनुपस्थिती होती, असं नोटिशीत म्हटलं आहे.
लोकसभा निवडणूक काळात आपल्या परिवाराने भाजपाच्या विरोधात काम केल्याचे निदर्शनास आले. पत्रकार परिषदेत आपल्या परिवारातील सदस्यांनी भाजपाच्या माढा आणि सोलापूर लोकसभेच्या जागा पाडण्यासंदर्भात जाहीर वक्तव्य केले.
आपल्या कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान भाजपाच्या बूथ प्रमुखांना धमकावणे, पोलिंग एजंट मिळू न देणे असे प्रकार केल्याचे निदर्शनात आल्याचेही नोटीसमध्ये लिहिले आहे.
लोकसभा निवडणूक मतदानाच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवाराची गळाभेट घेऊन माढा लोकसभा मतदारसंघातील जनतेला भाजपा विरोधी मतदानास प्रवृत्त केल्याचे निदर्शनास आले.
विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्या परिवारातील सदस्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे मफलर गळ्यात घालून भाजपा विरोधी काम केल्याचे निदर्शनास आल्याचेही यात म्हटले आहे.
महायुतीच्या सरकारने ज्या शंकर सहकारी कारखान्यास आर्थिक मदत केली त्याच कारखान्यातील चिटबॉयकडून आपण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचा प्रचार केला
तसेच कारखान्याच्या सिव्हिल विभागातील कर्मचाऱ्यांकडून सदाशिवनगर येथील रहिवाशांना घरोघरी जाऊन राष्ट्रवादीच्या उमेदवारास मतदान करण्यास भाग पाडल्याचे निदर्शनास आले.
पोलिंग एजंटला आपल्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झाल्याचे निदर्शनास आले आहे. हे सर्व विषय अतिशय गंभीर असून यावर आपले काही स्पष्टीकरण असल्यास पुढील सात दिवसात लेखी स्वरुपात सादर करावे, असा आदेश मोहिते पाटलांना देण्यात आला आहे.