राहुल गांधी 23 डिसेम्बरला परभणीत
Rahul Gandhi in Parbhani on 23rd December
परभणीत 10 डिसेंबर रोजी संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर परभणीत मोठा हिंसाचार झाल्याचे दिसून आले.
या घटनेत काहींना अटक करण्यात आली होती. त्यामध्ये पोलिसांच्या कोठडीत असताना सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला होता. या घटनेचे पडसाद हिवाळी अधिवेशनातही उमटले.
या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी परभणीत सूर्यवंशी कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. तर उपमुख्यमंत्री अजित पवार देखील आज परभणीत होते .
आता काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी हे देखील परभणी दौऱ्यावर येणार आहेत. त्यामुळे आता परभणीचा मुद्दा आणखी तापणार आहे.
शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत परभणीतील घटनेबाबत सभागृहात निवेदन देत माहिती दिली. परभणीत झालेल्या तोडफोडीत तब्बल 1 कोटी 89 लाख 54 हजारांचं नुकसान झाले.
पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी वाजवीपेक्षा जास्त बळाचा वापर केल्याचा आरोप करण्यात आला होता. यावरून पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांचं निलंबन करण्यात आल्याची माहितीही फडणवीसांनी दिली.
तसेच कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला राज्य सरकारकडून 10 लाख रुपये मदत जाहीर करण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले.
यानंतर आज शरद पवार यांनी परभणीत जात सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेतली. आता राहुल गांधी हे देखील सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेण्यासाठी 23 तारखेला परभणीत जाणार आहेत.
23 तारखेला सकाळी 11 वाजता राहुल गांधी दिल्लीहून विशेष विमानाने नांदेड पोहोचतील. त्यानंतर 1.15 वाजता ते गाडीने नांदेडहून परभणीला जातील.
2.45 च्या सुमारास राहुल गांधी सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची शोक भेट घेतील. यानंतर ते दिल्लीसाठी रवाना होतील. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यासह राज्यातील महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. परभणीतून राहुल गांधी काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.