राहुल गांधींच्या परभणी दौऱ्याला चंद्रशेखर बावनकुळें म्हणाले ‘नौटंकी’
Chandrashekhar Bawankule called Rahul Gandhi's Parbhani visit 'a stunt'
परभणीत 10 डिसेंबर रोजी संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर परभणीत मोठा हिंसाचार झाल्याचे दिसून आले.
या घटनेत काहींना अटक करण्यात आली होती. त्यामध्ये पोलिसांच्या कोठडीत असताना सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला होता. या घटनेचे पडसाद हिवाळी अधिवेशनातही उमटले.
या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी हे उद्या परभणी दौऱ्यावर येणार आहेत. राहुल गांधी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहे. यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल केलाय.
परभणीच्या घटनेतील आरोपी हा मनोरुग्ण आहे. तरी यांना राजकारण करायचं असल्यामुळे असे होत आहे. त्या ठिकाणी घडलेली घटना दुर्दैवी आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे काँग्रेसने राजकारणात पराभव करण्याचं काम केलं.
सर्वसामान्यांना अधिकार मिळत असताना बाबासाहेब सभागृहात येणार नाही याची तयारी काँग्रेसने केली होती. काँग्रेसचा राहुल गांधी यांचा उद्याचा दौरा हा नौटंकी आहे. महाराष्ट्रातील समाज त्यांना साथ देणार नाही, अशी टीका त्यांनी यावेळी राहुल गांधींवर केली.
शरद पवार शनिवारी परभणी दौऱ्यावर होते. परभणीत शरद पवारांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. याबबत चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, शरद पवार यांच्या वयानुसार ते वैद्यकीय परिस्थितीमुळे काल सोफ्यावर बसले असतील.
या विषयावर टीकाटिप्पणी करणे योग्य नाही. पण त्या कुटुंबाने सुद्धा वर बसायला पाहिजे होतं, त्यावेळी आयोजकांनी काय केलं, त्याची मला माहिती नाही, म्हणून त्यावर बोलणे योग्य होणार नाही, असे त्यांनी म्हटले होते.
महायुतीत खातेवाटप जाहीर होताच पालकमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे. याबाबत विचारले असता 12 जिल्ह्यात मंत्री नसले तरी, ज्या पद्धतीने खातेवाटप पार पडले आहे, त्याच पद्धतीने पालकमंत्रीपदाचे वाटप होईल, त्यात वाद होणार नाही, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले.
मंत्रिमंडळातून डावलल्याने राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ नाराज आहेत. आज छगन भुजबळ ओबीसी नेत्यांसोबत बैठक घेणार असून ते नेमका काय निर्णय घेणार? याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
याबाबत विचारले असता चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, महायुतीमध्ये भुजबळ साहेबांचं मोठं स्थान आहे. भुजबळ साहेबांच्या राजकीय आयुष्याचा योग्य निर्णय राष्ट्रवादी पक्ष घेईल. अजित दादा, प्रफुल तटकरे योग्य निर्णय घेतील, असे त्यांनी यावेळी सांगितले.
चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर महसूलमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. याबाबत ते म्हणाले की, मला महसूल खात्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
संपूर्ण महसुली विभागाचा शेतकरी, शेतमजुरांना समाजातील शेवटच्या माणसाशी संबंध असतो. महसूल खात्यातील कायद्यात सुधारणा आवश्यक आहे.
छोट्या छोट्या कारणामुळे विकास प्रकल्प थांबले आहेत. त्यांना पुढे नेण्याचे काम करू. 86 हजार हेक्टर झुडपी जंगलावर कोणतेही झाडे झुडपे नसताना त्याची नोंदी झुडपी जंगल केली आहे.
त्याचे प्रकरण सुप्रीम कोर्टात सुरू आहे. आवश्यक ठिकाणी झुडपी जंगल येथील कायद्याची अडचण दूर होईल, असे त्यांनी म्हटले.