संसदेत घुसखोरी करणारे आरोपी;काय करतात कामधंदा ?
Accused of infiltrating the parliament; what do they do?

लोकसभेत तसेच संसदभवन परिसरात धुराच्या नळकांडया फोडणाऱ्या चौघांसह त्यांच्या दोन साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे.
सागर, मनोरंजन, नीलम व अमोल शिंदे अशी आरोपींची नावे आहेत. विरोधकांनी या घटनेच्या सखोल चौकशीची मागणी करत सरकारला धारेवर धरले
बुधवारी लोकसभेत पिवळा धूर पसरवणारे आणि बाहेरही धूर पसरवून घोषणाबाजी करणारे आरोपी कोण आहेत? ते काय करतात या सगळ्याची ओळख पटली आहे.
सागर शर्मा, नीलम आझाद, मनोरंजन, डी, अमोल शिंदे, विक्की शर्मा आणि ललित झा यांच्यात कुठलीही समानता नाही. सगळे आरोपी वेगवेगळ्या प्रकारचा व्यवसाय किंवा नोकरी करतात.
बेरोजगारी, मणिपूर हिंसा असे मुद्दे समोर आणण्यासाठी आम्ही हे सगळं केलं असं या आरोपींनी पोलिसांना सांगितलं आहे. या आरोपींमध्ये कुणी इंजिनिअर आहे तर कुणी ई रिक्षा चालक. आपण जाणून घेऊ या सगळ्यांबाबत
सागर शर्मा
बुधवारी लोकसभेत उड्या मारुन शिरणाऱ्या आणि पिवळा धूर पसरवणाऱ्या दोन युवकांपैकी एकजण आहे सागर शर्मा. सागर शर्मा मूळचा लखनऊचा आहे.
२७ वर्षीय सागरचा जन्म दिल्लीत झाला होता. तो त्याच्या आई-वडिलांसह लखनऊला राहतो. तो लखनऊमध्ये ई रिक्षा चालवतो. भगतसिंग आणि मार्क्सवादी क्रांतिकारी चे ग्वेरा या दोघांनाही तो खूप मानतो.
सागर शर्मा हा तोच तरुण आहे ज्याने अध्यक्षांच्या खुर्चीपर्यंत धावण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्याला आधीच पकडण्यात आलं. रविवारी त्याने आईला सांगितलं होतं की मी काहीतरी मोठं करण्यासाठी दिल्लीला चाललो आहे.
मनोरंजन डी
मनोरंजन डी हा मैसूरचा तरुण आहे. तो कॉम्प्युटर इंजिनिअर आहे. त्याने ही पदवी घेतल्यानंतर नोकरी केली होती की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
मात्र लोकसभेत गॅलरीतून उडी मारुन धूर पसरवणारा हा दुसरा तरुण होता. त्यालाही अटक करण्यात आली आहे. त्याचे वडील देवराजे गौडा यांना मनोरंजनचं वागणं मुळीच पसंत नव्हतं.
त्याने काही चुकीचं केलं तर त्याला फाशी दिली तरीही चालेल असंही त्याच्या वडिलांनी म्हटलं आहे. संसद हे आपल्या देशाचं मंदिर आहे.
महात्मा गांधी, पंडित नेहरु यांच्याप्रमाणे अनेक लोकांच्या त्याच्या निर्मितीत सहभाग आहे. त्या ठिकाणी जाऊन असं कृत्य करणं योग्य नाही असं त्याच्या वडिलांनी म्हटलं आहे.
नीलम आजाद
नीलम आजाद कडे एम. फिल. ची पदवी आहे. नीलम आझाद नीट परीक्षाही उत्तीर्ण झाली आहे. तिच्याकडे नोकरी मिळण्याइतकं सगळं शिक्षण आहे. मात्र संसदेबाहेर घोषणाबाजी करण्यात तिचाही सहभाग होता.
तिने लाल आणि पिवळ्या रंगाचा धूर पसरवत घोषणाबाजी केली. नीलमने शेतकरी कायद्यांच्या विरोधात जे आंदोलन झालं होतं त्यातही भाग घेतला होता. तसंच बृजभूषण सिंग यांच्या विरोधात महिला मल्लांनी पुकारलेल्या आंदोलनातही नीलम सहभागी झाली होती.
अमोल शिंदे
महाराष्ट्रातला अमोल शिंदे हा मुलगा नीलमसह संसदेच्या बाहेर घोषणा देत होता. महाराष्ट्रातल्या लातूरमधला हा अमोल एका शेतमजूराचा मुलगा आहे.
त्याने दोनवेळा पोलीस भरतीसाठी प्रयत्न केला मात्र त्यात त्याला अपयश आलं. अमोलचे वडील म्हणाले की अमोलने आम्हाला सांगितलं तो दिल्लीला भरतीसाठी चालला आहे.
आम्हाला माहीत नाही तो असं काही पाऊल उचलेल. त्याला लष्कर किंवा पोलिसात भरती व्हायचं होतं. त्याने लोकसभेत जाऊन काय केलं ते आम्हाला माहीत नाही हे देखील त्याचे आई वडील म्हणाले.
काय घडली घटना?
लोकसभेचं कामकाज सुरु होतं. शून्य प्रहर संपण्यासाठी काही मिनिटं उरली होती. त्यावेळी लोकसभेच्या गॅलरीमध्ये बसलेल्या दोन युवकांनी मुख्य भागात उडी मारली.
जिथे खासदार बसतात, त्या ठिकाणी त्यांनी उड्या मारुन आपल्या बुटातून स्प्रे काढला आणि धूर पसरवण्यास सुरुवात केली तसंच नारेबाजीही केली.
या दोघांनाही खासदारांनी पकडलं आणि सुरक्षा रक्षकांच्या ताब्यात दिलं. आतमध्ये ही घटना घडत असतानाच लोकसभेच्या बाहेर एक महिला आणि एक तरुण या दोघांनीही धूर पसरवत नारेबाजी केली.
या महिलेचं नाव नीलम आणि मुलाचं नाव अमोल शिंदे असल्याचं समजतं आहे. या सगळ्या आरोपींवर युएपीए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.