सुप्रिया सुळे चिडल्या, प्रफुल्ल पटेलांना कॉल म्हणाल्या..

Supriya Sule got angry and called Praful Patel.

 

 

 

महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार का, असा प्रश्न विचारला जात आहे. कारण दोन राष्ट्रवादी एकत्र होण्याच्या आशा व्यक्त होत असतानाच आता

 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवारांच्या पक्षाला पुन्हा एकदा सुरुंग लावण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा आहे.

 

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार पक्षाच्या तब्बल सात खासदारांना संपर्क साधल्याची माहिती आहे.

 

विशेष म्हणजे खासदार सुप्रिया सुळे या प्रकारामुळे चिडल्या असून त्यांनी माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांना फोन करुन याबाबत नाराजी व्यक्त केल्याचेही बोलले जात आहे.

 

शरद पवार गटातील खासदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न अजित पवार करत आहेत का, असा सवाल विचारला जात आहे. अजितदादांनी ‘ऑपरेशन घड्याळ’ची जबाबदारी सुनील तटकरे यांच्या खांद्यावर टाकली आहे.

 

तटकरेंनी सात खासदारांना संपर्क केला आहे. सुप्रिया सुळे वगळता सात जणांची त्यांनी स्वतंत्र भेट घेतल्याचे बोलले जात आहे.

केंद्र सरकारला अधिक स्थैर्य देण्याचा अजित पवारांकडून प्रयत्न होत आहे. त्यानुसार सुनील तटकरे यांनी सात खासदारांना सोबत येण्याची गळ घातली. आमच्यासोबत सत्तेत सामील व्हा,

 

मात्र याबद्दल इतक्यात कोणालाही काही सांगू नका, असंही तटकरेंनी खासदारांना सांगितलं. मात्र सातही जणांनी ऑफर धुडकावली. इतकंच नव्हे, तर शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना ऑफरबद्दल सांगितलं.

 

हा प्रकार ऐकून सुप्रिया सुळे यांचा पारा चांगलाच चढला. प्रफुल पटेल यांना फोन करुन सुप्रिया सुळेंनी नाराजी व्यक्त केली. पुन्हा तुम्ही आमचा पक्ष फोडण्याचा प्रयत्न का करत आहात? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी विचारल्याची माहिती आहे.

 

दरम्यान, शरद पवार गटाचे खासदार नीलेश लंके यांनी असा संपर्क झाल्याचे वृत्त नाकारले. आम्हाला कुठलीही ऑफर आलेली नाही, आणि तसा निर्णयही होणार नाही.

 

राजकारणात कुठल्याही गोष्टीला सामोरं जायचं असतं, सत्ता नसतानाही संघर्ष करण्याची तयारी ठेवायची असते, असं सांगत सुनील तटकरेंना मी भेटलो नाही, इतरही कुणी भेटलं नाही,

 

असा दावा लंकेंनी केला. तर अजितदादांच्या राष्ट्रवादीचे विधान परिषदेवरील आमदार अमोल मिटकरी यांनी मात्र पवार गटाचे काही आमदार खासदार संपर्कात असल्याचा दावा केला आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *