दोन लाचखोर अधिकारी लाच घेतांना अटक
Two corrupt officials arrested while accepting bribe
अनधिकृत बांधकामावर कारवाई न करण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच घेणाऱ्या भिवंडी निजामपूर शहर महापालिकेच्या दोन अधिकाऱ्यांना मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी)
च्या पथकाने अटक केली. सहायक आयुक्त सुनील भोईर आणि प्रभारी बीट निरीक्षक अमोल वारघडे असे अटक करण्यात आलेल्या लाचखोर अधिकाऱ्यांची नावे आहेत.
भिवंडी निजामपूर शहर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ४ मध्ये चार मजली इमारतीचे बांधकाम करण्यात आले आहे. हे बांधकाम अनधिकृत असल्याचे सहायक आयुक्त सुनील भोईर यांनी जाहीर केले होते.
त्यामुळे इमारत बांधणाऱ्या व्यावसायिकाने भोईर यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान भोईर यांनी इमारतींवर पाडकामाची कारवाई न करण्यासाठी व्यावसायिकाकडे दीड लाख रुपयांची मागणी केली.
इतकी रक्कम देणे शक्य नसल्याचे व्यावसायिकाने सांगितले. त्यावर तडजोड करून एक लाख ३० हजार रुपये द्या, असे भोईर यांनी सांगितले.
कोणत्याही प्रकारची लाच द्यायची नसल्याने बांधकाम करणाऱ्याने मुंबई एसीबीच्या कार्यालयात प्रत्यक्ष भेट देऊन लेखी तक्रार केली. तक्रारीची शहानिशा केली असता, त्यामध्ये तथ्य असल्याचे आढळले.
त्यानुसार एसीबीच्या पथकाने सापळा रचला. बांधकाम करणाऱ्याकडून ५० हजारांचा पहिला हप्ता घेताना बीट निरीक्षक अमोल वारघडे याला पकडण्यात आले.
भोईर यांच्या वतीने त्याने हे पैसे स्वीकारल्याचे समोर आल्यानंतर त्यांनाही अटक करण्यात आली. या दोघांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना २२ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.