शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत काय म्हणाले अजित पवार ?
What did Ajit Pawar say about farmers' loan waiver?

राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा उल्लेख मी कधी केलाच नव्हता, अशा आशयाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वक्तव्य अलीकडे चांगलेच गाजले होते.
त्यामुळे महायुती सरकारने निवडणूक संपल्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन पाळले नाही, अशी टीका विरोधकांकडून सुरु झाली होती. अजित पवार यांच्या वक्तव्यामुळे शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार नाही,
असे संकेत मिळाल्याने त्यांच्यावरही टीकेची झोड उठली होती. या पार्श्वभूमीवर शनिवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी या मुद्द्यावर स्पष्टीकरण दिले.
अजित पवारांचा कर्जमाफीला विरोध, ही बातमी प्रसारमाध्यमांनी चालवली होती. आपण बातम्या देताना काय बातम्या देतोय, याचा विचार केला पाहिजे. मी शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार नाही, असं कधी म्हणणार नाही.
आम्हीदेखील शेतकरी आहोत. जिथे शेतकऱ्याला मदत होईल, अशा गोष्टी करण्याचा प्रयत्न आम्ही करतो.
मात्र, धादांत खोट्या बातम्या देऊन माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सूत्रांच्या हवाल्याने कर्जमाफीची बातमी देण्यात आली. पण मला बोलायचं असेल तर मी स्वत: बोलेन.
तरीही प्रसारमाध्यमांकडून सूत्रांच्या हवाल्याने का बातम्या दिल्या जातात? या ‘सूत्रा’ला जीवनगौरव पुरस्कार दिला पाहिजे, अशी टिप्पणी अजित पवार यांनी केली.
यावेळी अजित पवार यांनी पुण्यातील गुलेन बॅरी सिंड्रोमच्या वाढत्या फैलावाबाबतही भाष्य केले. राज्य सरकार आणि आरोग्य विभाग लक्ष ठेवून आहे. या आजाराच्या उपचारासाठी जास्त खर्च येत आहे.
आर्थिक बाबी सांभाळायचं काम सरकारकडे आहे. मी सोमवारी यासंदर्भात मंत्रालयात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहे.
तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही चर्चा करेन, असे अजित पवार यांनी म्हटले.
महात्मा फुले कृषी विद्यापीठात 60 कोटींच्या आराखड्याला मान्यता देण्यात आल्याचे अजित पवार यांनी सांगितले. सामजिक न्याय आयुक्तालय ,दिव्यांग कार्यालयाच्या कामासाठी 225 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
पुण्यात लवकरच टाऊन प्लॅनिंग कार्यालय उभारले जाणार आहे. साखर संकुलला सहकार भवन करणार. राज्यातील अनेक कार्यालये पुण्यात होत आहेत, असे अजित पवार यांनी म्हटले.
कर्जमाफीच्या निर्णयावरुन महायुतीत मतभेद असल्याची चर्चा आहे . पण महायुतीत कुठलेच मतभेद नाहीत.
अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील . अर्थमंत्री म्हणुन अजित पवार यांच्या काही कल्पना असतील,
त्याबाबत मला नाही. राज्याच्या आर्थिक परिस्थितीबाबत चर्चा होऊन कर्जमाफीचा निर्णय होईल. यात मतभेदाचा विषय नाही, असे भाजप नेते अशोक चव्हाण यांनी म्हटले.
दरम्यान एसटी महामंडळाने आजपासून प्रवासी भाडेवाढ होण्याची घोषणा केली आहे. आजपासून एसटीने 15 टक्क्यांची भाडेवाढ लागू केली आहे. मात्र या एसटी भाडेवाढबाबत संभ्रम असल्याचे पाहायला मिळतेय.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र अद्याप भाडेवाढ करण्यात आली नाही, असं म्हटलं आहे. त्यामुळं एसटीची भाडेवाढीबाबत संभ्रम पाहायला मिळत आहे.
अजित पवार आज पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यात पत्रकारांशी बोलताना त्यांना एसटीच्या भाडेवाढीबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी भाडेवाढीबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नाही, असं म्हटलं आहे.
‘एसटी भाडेवाढीच्या बाबत जास्तीत जास्त बसेसे घेऊन ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील लोकांना उत्तम सेवा द्यायची आहे. मात्र तशा पद्धतीने चर्चा अजून चालली आहे.
अंतिम निर्णय झालेला नाही. मुख्यमंत्री दावोसवरुन आत्ताच आले आहेत. अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालूनच घेतला जाईल,’ असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
‘एसटी भाडेवाडी बाबत अंतिम निर्णय झालेला नाही. मुख्यमंत्र्यांशी बोलून निर्णय होईल. जनता आणि महामंडळ दोघांच्या हिताचा विचार करून मध्यम मार्ग काढला जाईल.
शहरी तसेच ग्रामीण भागामध्ये एसटीची सेवा अधिकाअधिक प्रमाणात उपलब्ध करून देणे तसेच नवीन बसेस खरेदी करणे यासाठी भाडेवाडीचा प्रस्ताव आहे. मात्र अंतिम निर्णय हा मुख्यमंत्र्याचा असतो,’ असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांनीही एसटी भाडेवाढबाबत मला काही माहिती नाही, असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. कोणताही भाडेवाढीचा किंवा जनतेशी निर्णय हे कॅबिनेटमध्येच होतात.
पण अजित पवार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाली असेल एखाद्या वेळेस मला माहिती नाही. महायुतीचे निर्णय हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करूनच असे निर्णय झाले पाहिजे असे मला वाटते, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
एसटी भाडेवाढीबाबतचा निर्णय हा प्रस्तावित आहे. महामंडळाला नवीन बसेस घ्यायच्या आहेत त्यामुळं भाडेवाढ गरजेची आहे. मात्र हा निर्णय अद्याप प्रस्तावित आहे. मुख्यमंत्र्यांची भूमिका अतिशय महत्त्वाची असते. त्यामुळं एसटी भाडेवाढीबाबत अद्याप संभ्रम आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेतला जाईल.