आदित्य ठाकरेंनी दिले थेट मुख्यमंत्री शिंदेंना चॅलेंज
Aditya Thackeray gave a direct challenge to Chief Minister Shinde

ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघातून निवडणूक लढवतो, असं म्हणत आव्हान दिलं आहे. सरकार निवडणुका घेत नाही, त्यावरुनही ठाकरेंनी समाचार घेतला.
आदित्य ठाकरे म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा आणि वरळीमधून लढावं, असं मी नेहमी म्हणतो.
परंतु त्यांना ते जमत नसेल तर मी स्वतः ठाण्यातून निवडणूक लढविण्यास तयार आहे. त्यांनी माझ्यासमोर उभं राहावं किंवा मी त्यांच्यासमोर उभं राहातो, असं थेट आव्हान ठाकरेंनी शिंदेंना दिलं.
आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, मुळात निवडणुका होत नाहीत. सरकार जाणीवपूर्वक निवडणुका घेण्यास धजावत नाही. निवडणुकीवरुन उच्च न्यायालयाने सरकारवर ताशेरे ओढलेले आहेत.
पुणे आणि चंद्रपूर लोकसभेच्या निवडणुका घ्या, असं कोर्टाने म्हटलं होतं. शिवाय आपल्याकडे नगर पालिका, महानगर पालिका, सिनेट या निवडणुका झालेल्या नाहीत.
”निवडणुका घेण्यासाठी सरकारमध्ये हिंमत नाहीये. त्यामुळे लोकशाहीचं पुनरुज्जीवन करण्यासाठी आमचा लढा सुरु आहे. दुसरीकडे धारावीचा विकास करताना केवळ सरकारच्या मित्राचा विकास होऊ नये,
गोरगरीबांचं नुकसान होऊ नये, अशी आमची भूमिका आहे.” असं म्हणत आदित्य ठाकरेंनी केंद्र आणि राज्य सरकारवर ताशेरे ओढले.
मी घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना एक-दीड वर्षांपासून सांगतोय की, त्यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाचा आणि आमदारकीचा राजीनामा द्यावा. माझ्यासमोर वरळीतून लढावे अन्यथा मी त्यांच्याविरुद्ध ठाण्यातून लढायला तयार आहे.
बोरिवली-विरार या रेल्वेसाठी काही कांदळवन हलवायचा प्रयत्न होत आहे. तसा प्रस्ताव तयार करण्यात येत असल्याची मला माहिती मिळाली.
विशेष म्हणजे हे कांदळवन गडचिरोलीला हलविणार असल्याची माहिती आहे. हे तर जखम मांडीला आणि मलम शेंडीला, असा टोला त्यांनी लगावला.