कॅबिनेट मीटिंगमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांनी सेनेच्या मंत्र्यांना सुनावले खडेबोल
Chief Minister Fadnavis delivered harsh words to Sena ministers in the cabinet meeting.

महायुती सरकारच्या कॅबिनेट बैठकीत हायव्होल्टेज ड्रामा झाला. ओएसडी, पीए यांच्या नेमणुका बऱ्याच कालावधीपासून रखडल्या आहेत. त्याबद्दल शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आज विचारणा केली.
पीए, ओएसडींच्या नेमणुका महिना, दीड महिना उलटूनही होत नाहीत. आम्ही कामं कशी करायची. नेमणुका करण्यात अडचणी काय आहेत, असा सवाल शिंदेंच्या मंत्र्यांनी विचारला.
त्यावर मी दलालांच्या नेमणुका करायच्या नाहीत. मला दलालमुक्त मंत्रालय हवंय, असं उत्तर मुख्यमंत्र्यांनी शांतपणे दिलं. एबीपी माझानं याबद्दलचं वृत्त दिलं आहे
महायुती सरकारची कॅबिनेट बैठक आज संपन्न झाली. त्यात शिवसेनेच्या मंत्र्यांनी पीए, ओएसडी यांच्या रखडलेल्या नियुक्तांचा विषय काढला. त्याआधी सगळ्या अधिकारी वर्गाला बाहेर काढण्यात आलं.
काही वाद झाल्यास अधिकारी वर्गासमोर नको, याची काळजी घेण्यात आली. अशोभनीय प्रकार टाळण्यासाठी अधिकाऱ्यांना बाहेर ठेवण्यात आलं. यानंतर सेनेच्या मंत्र्यांनी ओएसडी, पीए यांच्या रखडलेल्या नियुक्तांचा मुद्दा मुख्यमंत्र्यांसमोर उपस्थित केला.
महिनाभरापासून मनात असलेली खदखद शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडली. ‘एक, दीड महिना झाला. तरीही पीए., ओएसडींच्या नेमणुका झालेल्या नाहीत.
जे अधिकारी वर्षानुवर्षे आमच्यासोबत आहेत. त्यांच्या नेमणुका करण्यात काय अडचण आहे? त्यांच्या नियुक्त्या का केल्या जात नाहीत?’ अशा प्रश्नांची सरबत्ती सेनेच्या मंत्र्यांकडून करण्यात आली.
शिवसेनेचे मंत्री प्रश्नांचा मारा करत असताना मुख्यमंत्र्यांनी त्यांची भूमिका शांतपणे मांडली. ‘काही अधिकारी या विभागातून त्या विभागात हीच कामं करत आलेले आहेत.
त्यांचे संबंध दलालांशी आहेत. मला मंत्रालय दलालमुक्त करायचं आहे. त्यामुळे ज्या अधिकाऱ्यांबद्दल शंका आहे, चारित्र्य पडताळणीत जे दोषी सापडले आहेत,
त्यांची शिफारस माझ्याकडे करु नका. सरकारच्या भल्यासाठी मी या गोष्टी बोलतोय. उद्या तुमच्या विभागात या अधिकाऱ्यांमुळे अडचणी येऊ शकतात,’ अशा शब्दांत फडणवीसांनी शिवसेनेच्या मंत्र्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
मुख्यमंत्र्यांनी घेतलेली भूमिका शिवसेनेच्या मंत्र्यांना पटलेली नाही. फडणवीसांच्या उत्तरानं त्यांचं समाधान झालेलं नाही. ‘जे अधिकारी २०१४ पासून आमच्यासोबत आहेत, ज्यांच्यावर आमचा विश्वास आहे,
त्या अधिकाऱ्यांच्या नेमणुका का करायच्या नाहीत,’ असा सेनेच्या मंत्र्यांचा सवाल आहे. सोबत असलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या, त्यांच्या जागी नवे अधिकारी आले तर मग आमच्यावर नाहक दबाव येईल, असा सूर सेना मंत्र्यांच्या गोटात आहे