महायुतीत एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर कुरघोडी?

Eknath Shinde's criticism of Chief Minister Devendra Fadnavis in the Mahayuti?

 

 

 

राज्यातील गरीब आणि गरजू रुग्णांच्या मदतीसाठी राज्यभरात मुख्यमंत्री वैद्यकीय साह्य निधी कक्ष आधीपासूनच कार्यरत असताना, आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून नव्या उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.

 

आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांच्या मदतीसाठी नवी समांतर यंत्रणा कार्यान्वित करून शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर एकप्रकारे कुरघोडी केल्याची चर्चा रंगली आहे.

 

मुख्यमंत्री फडणवीस यांनी २०१४साली मुख्यमंत्री झाल्यानंतर मुख्यमंत्री वैद्यकीय साह्य निधी कक्षाची स्थापना करून गरजू रुग्णांना आर्थिक मदत देण्यास सुरुवात केली.

 

त्यानंतर मुख्यमंत्रिपदी असताना शिंदे यांनी या कक्षाचे काम प्रभावीपणे नेले. त्याचवेळी उपमुख्यमंत्री असलेल्या फडणवीस यांनी विधी आणि न्याय विभागाच्या अंतर्गत मंत्रालयात उपमुख्यमंत्री राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्ष स्थापन केला.

 

या माध्यमातून धर्मादाय रूग्णालयांत निर्धन रूग्णांना उपचार, राज्यभरातून आरोग्य शिबिर भरवणे, तेच महात्मा फुले जनाआरोग्य योजनेअंतर्गत रूग्णांवर शस्त्रक्रिया करण्यासारखी सेवाभावी कामे केली जात होती. मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीसांनी हा कक्ष मुख्यमंत्री साह्यता निधी कक्षाला जोडला आहे.

दरम्यान, उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या ६०व्या वाढदिवसाचे औचित्य साधून नऊ फेब्रुवारी रोजी उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष सुरू करण्याची घोषणा करण्यात आली.

 

मुख्यमंत्री वैद्यकीय साह्यता निधी कक्षाचे माजी प्रमुख मंगेश चिवटे यांनी या कक्षाचे नेमके कामकाज कसे असेल याबाबत शनिवारी माहिती दिली.

उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष हा राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाशी संलग्न असणार आहे. या कक्षाच्या माध्यमातून राज्य सरकारच्या महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेची अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

 

मोफत रुग्णसेवा हा नागरिकांचा अधिकार असल्याने त्यांना महात्मा फुले योजनेच्या माध्यमातून मोफत उपचार मिळावेत, यासाठी कक्षातून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येणार आहेत.

 

उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून रुग्णांना थेट अर्थसाह्य वितरित केले जाणार नसले तरी मुख्यमंत्री वैद्यकीय साह्यता कक्ष, तसेच धर्मादाय रुग्णालय योजना,

 

राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम यांसह केंद्र सरकारच्या आयुष्मान भारत योजनेच्या माध्यमातून त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मोफत किंवा सवलतीच्या दरात उपचार देण्याबाबत समन्वयाची भूमिकाही या कक्षाद्वारे पार पाडली जाईल’, असे चिवटे यांनी नमूद केले

 

उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष हा मुख्यमंत्री वैद्यकीय साह्यता निधी कक्षाला पूरक उपक्रम आहे. हा कक्ष उपमुख्यमंत्री कार्यालयाचे एक अंग असून, उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या जागेतच कार्यरत असेल.

 

आरोग्यविषयक योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी व रुग्णांना मोफत आरोग्यसेवा मिळाव्यात, यासाठी हा कक्ष दुवा म्हणून काम करणार असल्याचेही चिवटे यांनी सांगितले.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *