राज्याचे कृषिमंत्री कोकाटेंना दोन वर्षांची शिक्षा

State Agriculture Minister Kokate sentenced to two years in prison

 

 

 

बनावट कागदपत्रांच्या आधारे सदनिका लाटल्याच्या प्रकरणात दोन वर्ष कारावासाची शिक्षा झाल्यानंतर महाराष्ट्राचे कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी

 

वकिलामार्फत जामिनासाठी केलेला अर्ज न्यायालयाने मंजूर केला. शिक्षेच्या निकालाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे ॲड. कोकाटे यांनी म्हटले आहे.

 

सुनावणीवेळी कृषिमंत्री कोकाटे हे न्यायालयात उपस्थित होते. शिक्षा सुनावल्यानंतर वकिलामार्फत त्यांनी जामिनाची प्रक्रिया सुरू केली. न्यायालयाने १५ हजार रुपयांच्या जातमुचकल्यावर त्यांचा जामीन अर्ज मंजूर केला.

 

यानंतर ॲड. कोकाटे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. राज्यातील सर्वच कृषिमंत्री वेगवेगळ्या प्रकरणात अडकल्याच्या प्रश्नावर त्यांनी हे प्रकरण आपण कृषिमंत्री झाल्यानंतरचे नसल्याकडे लक्ष वेधले. साधारणत: ३० वर्षांपूर्वीच्या या प्रकरणास राजकीय किनार आहे.

दिवंगत राज्यमंत्री तुकाराम दिघोळे यांच्याकडून या संदर्भात तक्रार केली गेली होती. नंतर मात्र आपली त्यांच्याशी चांगली मैत्री झाली. तेव्हा आपण राजकारणात नुकताच प्रवेश केला होता.

 

आमदार होतो की नव्हतो तेही स्मरणात नाही. तो काळ आणि आजचा काळ यात फरक आहे. पुढील काळात माजीमंत्री तुकाराम दिघोळे व आपल्यास सलोख्याचे, मैत्रीचे संबंध निर्माण झाले.

 

परंतु, एखादे कायदेशीर प्रकरण दाखल झाल्यानंतर कायदेशीररित्या नियमानुसार प्रक्रिया पार पडते. उशिराने ही प्रक्रिया झाली आणि न्यायालयाने आज निकाल दिला, असे कोकाटे यांनी सांगितले.

 

कमी उत्पन्न दाखवून चार सदनिका लाटल्याच्या प्रश्नावर कृषिमंत्री कोकाटे यांनी अद्याप आपण निकालपत्र वाचलेले नसल्याचे नमूद केले. सरकारी वकिलांचे म्हणणे माहिती नाही. निकालपत्र वाचल्यानंतर यावर सविस्तर प्रतिक्रिया देईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

 

न्यायालयाच्या निकालामुळे आपल्या राजीनाम्याची मागणी होऊ शकते. परंतु, अपिलात जाण्याची तरतूद आहे. राजकीयदृष्ट्या देशात अशा प्रकारचे अनेक निकाल झालेले आहेत.

 

आपण अपिलात जाणार आहोत. न्यायालयाला निकाल सुनावण्याचा अधिकार आहे, तसाच आपणास वरिष्ठ न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार असल्याचे कृषिमंत्री कोकाटे यांनी म्हटले आहे.

 

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाचे दोन मंत्री सध्या अडचणीत सापडले आहेत. राज्याचे माजी कृषीमंत्री आणि विद्यमान कृषीमंत्री दोघांच्या अडचणींमध्ये वाढ झाल्याचं चित्र आहे. पहिल्यांदा धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी झाली,

 

त्याचं कारण म्हणजे, बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणात मुख्य आरोपी असल्याचा ठपका असलेला वाल्मिक कराड हा माजी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचा असल्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणी सुरू झाली.

 

त्यानंतर हळूहळू त्यांच्यावरती अनेक आरोप होऊ लागले त्यानंतर आता मुंडे कृषीमंत्री असताना त्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव पास न करताच टेंडर काढल्याचा आरोप त्यांच्यावरती होत आहे, तर दुसरीकडे राज्याचे विद्यमान कृषीमंत्री माणिकराव कोकाटे देखील मोठ्या अडचणीत सापडले आहेत.

 

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासह बंधूंना दोन वर्षांचा कारावास आणि 50 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी

 

आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे कमी उत्पन्न दाखवून घर घेतल्याचा त्यांच्यावर आरोप होता आणि आज नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने कोकाटे बंधूंना दोन वर्षाचा कारावास आणि पन्नास हजार रुपयांचा दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावी अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून होताना दिसत आहे. अशातच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मुंडे कृषीमंत्री असताना त्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव पास न करताच टेंडर काढल्याचा आरोप करत सर्व पुरावे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना दाखवत मुंडेंचा राजीनामा घ्यावा अशी मागणी केली आहे.

 

तर आता राष्ट्रवादीचे दुसरे नेते, आमदार आणि राज्याचे विद्यमान कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांची आमदारकी रद्द होण्याची शक्यता आहे. माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. लोकप्रतिनिधीला दोन किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांची शिक्षा सुनावल्यास त्याचं सभागृहाचं सदस्यत्त्व रद्द होते.

 

त्यामुळे आता माणिकराव कोकाटे यांना मंत्रिपद आणि आमदारकी गमवावी लागू शकते. त्यामुळे आता माणिकराव कोकाटे वरिष्ठ न्यायालयात दाद मागणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. धनंजय मुंडेंनंतर माणिकराव कोकाटे यांच्या रुपाने अजित पवार गटाचा दुसरा मंत्री अडचणीत आला आहे.

 

धनंजय मुंडे यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुसर्‍या नेत्याच्या मंत्रिपदावर संकट ओढावलं आहे. त्यामुळे आता याप्रकरणात माणिकराव कोकाटे, अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस काय पावले उचलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

माणिकराव कोकाटे या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना म्हणाले, ही राजकीय केस होती. गेल्या 28 वर्षांपूर्वी ही केस रजिस्टर झाली आहे. त्यावेळेस दिघोळे साहेब हे राज्यमंत्री होते. माझा आणि त्यांचा राजकीय वैर होतं. त्या वैरात्वापोटी त्यांनी सरकारला सांगून माझ्यावर केस दाखल केली होती.

 

त्याचा निकाल 30 वर्षानंतर आज लागलेला आहे. न्यायालयाने त्यांचा निकाल सुनावलेला आहे. निकालपत्र 40 पानांचं आहे. ते मी अजून वाचलेले नाही. मी कायद्यानुसार जे काही करता येईल ते सगळं केलेलं आहे.

 

राजकीय दृष्ट्या देशात अशा प्रकारचे अनेक निकाल लागले आहे. मी हाय कोर्टात जाणार आहे. जसा निकाल सुनावण्याचा अधिकार न्यायालयाला आहे. तसाच आम्हाला देखील एक नागरिक म्हणून न्याय मागण्याचा अधिकार आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *