शरद पवार यांच्या जवळच्या दोन बड्या नेत्यांना सरकारचं मोठं गिफ्ट?
A big gift from the government to two big leaders close to Sharad Pawar?

विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठ यश मिळालं, महायुतीने स्पष्ट बहुमत मिळवत पुन्हा एकदा राज्यात सत्ता स्थापन केली, मात्र दुसरीकडे या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला.
विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर महाविकास आघाडीचे अनेक नेते आणि पदाधिकारी महायुतीमध्ये प्रवेश करताना दिसत आहेत. शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार प्रवेश सुरू आहेत.
दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे देखील भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे, मात्र जयंत पाटील यांनी ही चर्चा फेटाळून लावली आहे.
मात्र दोनच दिवसांपूर्वी जयंत पाटील यांनी मध्यरात्री भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली होती. या भेटीवरून पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं.
मात्र या भेटीचा कोणताही राजकीय अर्थ काढू नये असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.सांगली जिल्ह्यातले महसूल संबंधित काही प्रश्न होते. त्या संदर्भात निवेदन देण्यासाठी मी बावनकुळे यांची भेट घेतली.
माझ्यासोबत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माझा स्टाफ देखील होता. या भेटीमध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही असं स्पष्टीकरण या भेटीवर जयंत पाटील यांनी दिलं होतं.
मात्र आता या भेटीनंतर हालचालींना वेग आला आहे, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि नेते उत्तम जानकर यांना सरकारकडून पीए देण्यात आले आहेत.
या पीएंच्या पगाराचा खर्च देखील सरकारी तिजोरीमधून होणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे. विशेष म्हणजे शरद पवार गटाचे नेते उत्तम जानकर यांनी ईव्हीएमच्या मुद्द्यावर सरकारविरोधात मोठं आंदोलन उभारलं होतं.
या आंदोलनामुळे सरकारची डोकेदुखी वाढली असताना देखील त्यांना सरकारी पीए देण्यात आला आहे. यामुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे.
उत्तम जानकर यांनी ईव्हीएमवर शंका उपस्थित करत यापूर्वीच आंदोलनाचा इशारा दिला आहे. निवडणुका बॅलेट पेपरवर व्हाव्यात अशी त्यांची भूमिका आहे.