राज्यात वीज-ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता
Chance of rain with lightning and thunder in the state

होळी नंतरही देशभरात तापमानात चढ उतार पाहायला मिळत आहेत. अद्यापही उत्तरेकडे थंडीचा कडाका कायम असून ही संपूर्ण स्थिती पश्चिमी झंझावाताच परिणाम असल्याचं म्हटलं जात आहे.
याच कारणास्तव पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमध्ये पावसानं शिडकावा केला असून, इथं महाराष्ट्रातही अशीच काहीशी स्थिती पाहायला मिळत आहे.
देशाच्या किनारपट्टी भागांमध्ये घोंगावणारे वारे पाहता राज्यात काही अंशी दमट हवामान पाहायला मिळू शकतं. महाराष्ट्रातील हवामानाचा विचार करायचा झाल्यास इथं राज्यभरात उन्हाचा तडाखा कायम राहील.
तर, काही भागांमध्ये मात्र ढगाळ वातावरण कायम असेल. राज्यात सध्या उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
ज्यामुळं जळगाव, धुळे, नंदूरबार, छत्रपती संभाजीनगर इथं ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज आहे. चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली
आणि यवतमाळमध्येही विजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे. दरम्यानच्या काळात राज्यात वाऱ्यांचा वेग ताशी 30 ते 40 किमी इतका असेल अशी शक्यताही हवामान विभागानं व्यक्त केली आहे.
राज्यावर एकिकडे उन्हाळ्यातच पावसाचं सावट असतानाच दुसरीकडे विदर्भ आणि तिथं सोलापूरात पारा उच्चांकी पातळीवरही पोहोचला आहे.
बहुतांश भागांमध्ये तापमान चाळीशीपलिकडे गेल्यानं बाष्पीभवन प्रक्रियेला वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळं उन्हाचा दाह वाढत असतानाच मधूनच येणारं पावसाळी ढगांचं सावटही नागरिकांना राज्यात अनुभवता येणार आहे.
पुढील 24 तासांमध्ये मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये वातावरण कोरडं राहणार असून, किमान तापमान 26 ते 27 अंशांदरम्यान राहू शकतं.
तर, दुपारी तापमानाचा पारा कमाल 36 अंशांपर्यंत पोहोचू शकतो. इथं दाह मात्र 38 अंशांइतका असल्यानं नागरिकांच्या अडचणींमध्ये भर पडू शकते. ज्यामुळं मुंबईकरांनी उकाड्यापासून इतक्यात सुटका नाही हेच आता स्पष्ट होत आहे.
राज्यात सध्या विदर्भातील चंद्रपूर इथं सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली असून हा आकडा 42 अंशांच्या घरात पोहोचला आहे. तर,
पश्चिम महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात दमट वातावरणात वाढ झाली आहे. उत्तर महाराष्ट्रात मात्र पहाटेच्या वेळी काही अंशी गारठा पाडत असला तरीही सूर्य माथ्यावर आल्यानंतर मात्र परिस्थिती बदलत आहे.
एकिकडे उष्मा प्रचंड प्रमाणात वाढत असतानाच राज्याला पुढील 4 दिवस पावसाचा तडाखा सहन करावा लागणार असल्याचा इशारा हवामान विभागानं जारी केला आहे.
राज्यात 19 ते 22 मार्चदरम्यान पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून, वाढत्या उष्णतेमुळे बाष्पीभवनाचा वेग वाढून ढग तयार झाल्याने संपूर्ण देशात पावसाळी वातावरण तयार होत असल्याची माहिती हवामान विभागानं जारी केली आहे.
पुढील चार दिवसांत राज्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून, विदर्भात मात्र उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. या भागासाठी उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला असून, नागरिकांना या परिस्थितीमध्ये काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
यंदा फेब्रुवारी महिन्यापासूनच उष्णतेच्या वाढल्या असून, मार्च महिन्यातही हेच चित्र पाहायला मिळालं. बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्राकडून बाष्पयुक्त वारे आल्याने राज्यात ऊन, वारा, पावसासह ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे.
पुढील चार ते पाच दिवस ही स्थिती कायम असेल असंही सांगण्यात येत आहे. कोकण किनारपट्टी भागासह मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये काही अंशी ढगाळ वातावरणसदृश्य परिस्थिती असेल.
अतीव उत्तरेकडे असणाठऱ्या हिमाचल प्रदेश, काश्मीर, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश ते अगदी मध्य प्रदेशपर्यंत पावसाचा इशारा हवामान विभागानं जारी केला आहे. हिमालयापासून मध्य भारतापर्यंत वाहणाऱ्या वाऱ्यांचा वेग पाहता हवामानात सातत्यानं बदल होत असल्याचं सांगितलं जात आहे.