फहीम खान लगेच सापडला. पण कोरटकर का सापडत नाही?राष्ट्रवादीच्या नेत्याचा सरकारला घरचा आहेर
Fahim Khan was found immediately. But why not Koratkar? The government has a home for the NCP leader.

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान करून इतिहासकार इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देण्याचा आरोप असलेला नागपूर येथील पत्रकार प्रशांत कोरटकरचा अटकपूर्व जामीन काही दिवसांपूर्वी कोल्हापूर सत्र न्यायालयाने फेटाळला होता.
त्यानंतर त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली असून सोमवारी या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. तत्पूर्वी शनिवारी (२२ मार्च) प्रशांत कोरटकर हा दुबईत पळून गेल्याची माहिती समोर आली.
सोशल मीडियावर प्रशांत कोरटकरचा एक फोटो व्हायरल होत आहे. ज्यामध्ये प्रशांत कोरटकर आखाती देशातील कोणत्यातरी देशात उभा असल्याचे दिसत आहे.
त्याच्या मागे अरेबिक भाषेतील बोर्ड दिसत आहे. तसेच आखाती देशाची नंबर प्लेट असलेली गाडीही उभी असल्याचे दिसत आहे. हा फोटो आताचाच आहे की जुना? याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही.
नागपूर पोलीस किंवा कोल्हापूर पोलिसांनीही यावर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र राजकारणातून काही जणांनी यावर टिप्पणी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी आज सकाळी एक्सवर पोस्ट करून सदर प्रकाराची वाच्यता केली आहे.
त्यांनी लिहिले, “कोरटकर दुबईत पळून गेल्याची माहिती समोर. पाताळात जरी गेला तरी याला शोधून आणणे सरकार समोरचे आता मोठे आव्हान ठरले आहे. नागपूर वरून थेट दुबई गाठण्याकरिता कोरटकरने दंगलीचा आधार घेऊन पळ काढल्याचे एकंदरीत दिसते. गृह खात्याने त्याला तात्काळ मुसक्या आवळुन भारतात आणावे.”
आमदार अमोल मिटकरी यांचे ट्विट करत तसेच वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देतानाही त्यांनी याचा उल्लेख केला आहे. ते म्हणाले, नागपूरमध्ये हिंसाचार उसळल्यानंतर प्रशांत कोरटकर चंद्रपूरात असल्याचे कळते. चंद्रपूरात तो एका पोलीस अधिकाऱ्याला भेटल्याची माहिती समोर येत आहे.
कोरटकरला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन नामंजूर केल्यानंतर त्याच्यावर अटकेची टांगती तलवार होती. भाजपाचे स्थानिक आमदार परिणय फुके यांनी माध्यमांना सांगितले होते की, दोन दिवसात कोरटकरला अटक होईल.
आज असे समजत आहे की, तो दुबईला आहे. पण व्हायरल झालेला फोटो आताचा आहे का? याबाबत खात्री देता येत नाही. पण यानिमित्ताने नागपूर पोलिसांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अमोल मिटकरी पुढे म्हणाले की, नागपूर दंगलीचा आरोपी फहीम खान लगेच सापडला. पण कोरटकर का सापडत नाही? त्याला नागपूर पोलिसांचे अभय आहे का?
पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यासाठी वाव मिळत आहे. त्यामुळे नागपूर पोलिसांनीच त्याला लपवले आहे, असा माझा स्पष्ट आरोप आहे.