कवितेतून कुणाल कामरा शिंदेंना म्हणाला गद्दार;शिवसैनिकांची तोडफोड ;नव्या वादाला तोंड फुटलं
Kunal Kamra calls Shinde a traitor through poetry; sabotage by Shiv Sainiks; new controversy erupts

स्टॅण्डअप कॉमेडिअन कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणं रचून ते शोमध्ये सादर केल्याप्रकरणी नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
या प्रकरणात कुणाल कामराविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तसेच कुणाल कामराच्या विरोधात शिवसेना (शिंदे) पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.
यावरून कुणाल कामरावर कारवाई करण्याची मागणी शिवसेना (शिंदे) पक्षाच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत मोठा इशारा दिला आहे.
“तुम्ही स्टॅण्डअप कॉमेडी करा. मात्र, अपमानित करण्यात काम कोणी करत असेल, तर ते सहन केलं जाणार नाही”, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.
“स्टँडअप कॉमेडी करण्याचा अधिकार कोणालाही आहे. मात्र, स्वातंत्र्याचा स्वैराचार करण्याचा अधिकार कोणालाही नाही. खरं म्हणजे कुणाल कामराला हे माहिती पाहिजे की महाराष्ट्रातील जनतेने २०२४ साली कोण गद्दार
आणि कोण खुद्दार? हे दाखवून दिलेलं आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची विरासत कोणाकडे गेली? हे जनतेने दाखवून दिलेलं आहे.
त्यामुळे अशा प्रकारे खालच्या स्थराची कॉमेडी करून राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत अनादर करण्याचा अधिकार कोणालाही नाही, हे चुकीचं आहे”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
“तुम्ही जरुर स्टँडअप कॉमेडी करा, पण अपमानित करण्याचं काम कोणी करत असेल तर हे सहन केलं जाणार नाही. हे अतिशय चुकीचं आहे. स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने माफी मागितली पाहिजे.
तसेच कुणाल कामरा जे संविधानाचं पुस्तक दाखवत आहेत, ते संविधान जर त्यांनी वाचलं असेल तर संविधानाने सांगितलेलं आहे की स्वातंत्र्याचा स्वैराचार करता येणार नाही.
दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर तुम्हाला अतिक्रमण करता येणार नाही. त्यामुळे आमची मागणी आहे की त्यांनी माफी मागितली पाहिजे”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
“एखादा स्टँडअप कॉमेडीयन अशा प्रकारे गद्दार म्हणू शकत नाही. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी ज्यांनी गद्दारी केली त्यांना खरी बसवण्याचं काण जनतेने केलेलं आहे.
एखाद्याला कॉमेडी करण्याचा अधिकार आहे. मात्र, जर जाणूनबुजून अपमान करण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर हे सहन केलं जाणार नाही. यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
कुणाल कामराने खार येथील युनीकॉन्टिनेंटल हॉटेलमधील द हॅबिटॅट क्लबमध्ये शो घेतला होता. या क्लबमध्ये जाऊन एकनाथ शिंदेंच्या समर्थकांनी धुडगूस घातला.
या क्लबमधील खुर्च्यांची आणि संपूर्ण सेटची तोडफोड करण्यात आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीच खिल्ली उडवल्यानंतर त्यांचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले.
त्यामुळे शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातही शिवसेनेच्या समर्थकांनी जोरदार निर्देशने केली. वागळे इस्टेट पोलीस ठाण्याबाहेरही शिवसैनिकांनी कुणाल कामराचे फोटो जाळले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कॉमेडियन कुणाल कामराने एक कविता केली आणि त्यांना थेट गद्दार म्हटले. यामध्ये त्यांनी गुवाहटीचा देखील उल्लेख केला.
कुणाल कामराच्या या कवितेनंतर मोठा गदारोळ उडल्याचे बघायला मिळतंय. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील कुणाल कामराने माफी मागावी म्हणत राज्याच्या जनतेने गद्दार कोण आहेत
हे २०२४ च्या निवडणुकीमध्ये दाखवले आहे, असेही त्यांनी म्हटले. देवेंद्र फडणवीस यांनी कुणाल कामराला चांगलेच फटकारल्याचे बघायला मिळतंय.
शिवसैनिकांनी कालच ज्या हॉटेलमध्ये कुणाल कामरा याने कार्यक्रम घेतला आणि एकनाथ शिंदे यांच्यावर खालची टीका केली, त्या हॉटेलची तोडफोड केली.
शिवसैनिक आक्रमक झाल्याचे बघायला मिळतंय. पोलीस ठाण्यात शिवसैनिकांनी मोठी गर्दी केलीये. काही शिवसैनिकांवरही गुन्हे पोलिसांकडून दाखल करण्यात आले.
आता एकनाथ शिंदे यांच्याविरोधात केलेल्या कवितेनंतर कामराच्या प्रकरणावर बोलताना आमदार रोहित पवार हे दिसले आहेत. रोहित पवार म्हणाले की, व्यंगात्मक टीका ही ठाकरे साहेबांची ताकद होती.
जर एकनाथ शिंदे साहेब हे ठाकरेंचे कार्यकर्त्ये आहेत असे ते म्हणतात तर मला असे वाटते की, असे विषय ज्यावेळी होतात तेव्हा नेत्या म्हणून अशा गोष्टींकडे दुर्लक्ष केले पाहिजे.
तुम्ही जर दोन उदाहरणे घेतली तर राजीव गांधींबद्दल एका सीरिजमध्ये काही गोष्टी बोलल्या गेल्या त्यावेळी राहुल गांधीजींनी सांगितले होते की,
असे काही बोलल्याने राजीव गांधीजींचे कर्तृत्व कमी होणार नाही. पुढे रोहित पवार म्हणाले, २००३ मध्ये सुद्धा एका चॅनलवर भुजबळ साहेबांवर व्यंगात्मक टीका झाली होती.
त्यानंतर भुजबळ साहेबांच्या कार्यकर्त्यांनी ते कार्यालय फोडले होते. त्यानंतर २००३ मध्ये भुजबळ साहेब हे उपमुख्यमंत्री असताना सुद्धा त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.
ही विचारसरणी महत्वाची आहे. त्यामुळे कुठला कलाकार काही बोलत असेल तर उगाच त्याचे ऑफिस कोणी फोडले नाही पाहिजे.
पण मला अजून एक कलाकारांना विनंती करायची आहे की, हा काळ काही २०१४ च्या पूर्वीचा नाहीये. जिथे तुमच्या कलेला एक कला समजली जाईल.
इथे जर तुम्ही एखाद्या नेत्यावर बोलत असाल तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य आता राहिलेले नाहीये. त्यामुळे तुम्ही देखील त्याबाबतीची काळजी घ्या.
नेत्यांना देखील मला सांगायचे आहे की, प्रयत्न करा की असे जे काही कलाकार असतात व्यंगात्मक टीका किंवा व्यंगात्मक काही गोष्टी केल्या जातात त्या कुठेतरी मजेत स्वीकारल्या पण गेल्या पाहिजेत.
पण माझे एक मत आहे की, कोणी एखाद्या कलाकाराने व्यंगात्मक टीका केल्याने एकनाथ शिंदे साहेबांची उंची ही कमी होत नाही ते मोठे नेते आहेत आणि ते मोठे नेते राहणार आहेत.