२० लाखांची खंडणी मागणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल

Case registered against two for demanding ransom of Rs 20 lakhs

 

 

 

बुलेट, तसेच मोटार विक्री करणाऱ्या कंपनीविरुद्ध केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळ, तसेच महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार देण्याची धमकी देऊन २० लाखांची खंडणी मागणाऱ्या दोघांविरुद्ध वारजे पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

 

याप्रकरणी विजय म्हस्के आणि अविनाश रमेश रोकडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका वाहन विक्री करणाऱ्या कंपनीतील वरिष्ठ व्यवस्थापकांनी वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण वाहन विक्री करणाऱ्या कंपनीत वरिष्ठ व्यवस्थापक असून, ते सासवड परिसरातील एका गावात राहायला आहेत.

 

संबंधित कंपनी त्यांच्या मावसभावाची आहे. त्यांच्या कंपनीचे मोटार विक्री करण्याचे दालन वारजे भागात आहे. या दालनातील सर्व जबाबदारी पाहण्याचे काम त्यांच्याकडे आहे.

 

आराेपी विजय म्हस्के २०१७ मध्ये संबंधित कंपनीत कामाला होता. सहा महिने काम केल्यानंतर त्याने काम सोडून दिले होते. वारजे भागात कंपनीचे सर्व्हिस सेंटर आहे.

 

त्यानंतर म्हस्केने ११ मार्च रोजी व्यवस्थापाकाच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. कंपनीच्या कामासंदर्भात भेटायचे आहे, असे सांगून त्याने त्यांना मार्केट यार्ड भागातील एका हाॅटेलमध्ये बोलाविले.

वारजे भागातील कंपनीच्या सर्व्हिस सेंटर पर्यावरणविषयक निकषांची पूर्तता केली नाही. कंपनीकडे याबाबतचे प्रमाणपत्रही नाही. याबाबत केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळ आणि महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार देण्यात येणार आहे,

 

तसेच याबाबत देण्यात आलेली नोटीस त्याने व्यवस्थापकाला दाखविली. याप्रकरणाचा पाठपुरावा मी करणार आहे, असे म्हस्केने त्यांना सांगितले. त्यानंतर व्यवस्थापकाने म्हस्केला समजावून सांगितले.

 

‘तू कंपनीत काम केले आहे. विनाकारण त्रास देणे योग्य नाही,’ असे त्यांनी म्हस्केला सांगितले. त्यानंतर ‘मी नोटीस मागे घेतो, त्यासाठी काही तरी द्यावे लागेल’, असे म्हस्केने त्यांना सांगितले.

 

म्हस्केने त्यांना पुन्हा भेटायला बोलावले. ’याप्रकरणाचा पाठपुरावा करणार आहे. मंत्रालयात तक्रार देऊन तुमची कंपनी बंद पाडतो. पाठपुरावा न करण्यासाठी २० लाख रुपये द्यावे लागतील,’ असे त्याने सांगितले.

 

म्हस्केच्या सांगण्यावरुन अविनाश राेकडेने त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. नोटीस मागे घ्यायची असेल तर २० लाख रुपये द्यावे लागतील, अशी धमकी त्याने दिली.

 

म्हस्के आणि रोकडे यांच्या धमक्यांमुळे घाबरलेल्या व्यवस्थापकाने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन तरडे तपास करत आहेत.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *