अमित शहा यांची शिंदे-फडणवीसांसोबच रात्री उशिरापर्यंत बैठक;काहीतरी मोठं घडतंय?

Amit Shah's meeting with Shinde-Fadnavis till late at night; Is something big happening?

 

 

 

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं काहीतरी घडत असल्याचे संकेत मिळत आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेवेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भूमिका महत्त्वाची ठरली.

 

राज्यात सरकार स्थापनेपासून ते कोणत्या पक्षाला कोणती खाती, तर कुणाला कोणतं मंत्रिपद याबाबत सर्व महत्त्वाच्या चर्चा या अमित शाह यांच्याच अध्यक्षतेखाली पार पडल्या.

 

दिल्लीत मध्यरात्री उशिरा याबाबतच्या बैठका पार पडल्या होत्या. यानंतर आता राज्यात सरकार स्थापन होऊन चार महिने झाले आहेत.

 

तरीही राज्यातील महायुती सरकारमध्ये पालकमंत्रिपदाचा तिढा असेल किंवा आणखी काही मुद्द्यांवरुन मतभेद आहेत. ते सोडवण्यासाठी आता पुन्हा एकदा अमित शाह महत्त्वाची भूमिका निभावण्याची शक्यता आहे.

 

अमित शाह हे दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. अमित शाह काल महाराष्ट्रात दाखल झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची पुणे येथे भेट घेतल्याचं वृत्त समोर आलं होतं.

 

यावेळी एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्याकडे अर्थखात्याबाबत तक्रार केल्याची माहिती आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे असणाऱ्या अर्थ खात्याकडून शिवसेना मंत्र्यांच्या फायलींना लवकर मंजुरी मिळत नाही, अशी तक्रार एकनाथ शिंदे यांनी केल्याची माहिती आहे.

यानंतर अमित शाह आज रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. रायगडचा आजचा कार्यक्रम आटोपल्यानंतर अमित शाह राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनासाठी गेले.

 

या स्नेहभोजनाचं शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांना देखील निमंत्रण होतं. पण त्यांनी स्नेहभोजनाला जाणं टाळलं. यानंतर आता अमित शाह यांची मुंबईत सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक पार पडत आहे.

 

अमित शाह यांनी मुंबईत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत स्नेहभोजन केल्याची माहिती आहे.

 

यानंतर सह्याद्री अतिथीगृह येथे अमित शाह यांची शिंदे आणि फडणवीसांसोबत बैठक पार पडणार आहे. या बैठकीत निधीवाटप, महामंडळ आणि पालकमंत्री वाटपाबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.

 

तसेच महापालिका निवडणुकांबाबतही चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीत आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील प्रलंबित प्रकल्पांवर चर्चा होणार असल्याची शक्यता आहे.

 

अजित पवार हे साताऱ्या जिल्ह्याच्या दौऱ्यावर असल्यामुळे ते या बैठकीत उपस्थित राहणार नसल्याची देखील माहिती आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *