वानखेडे स्टेडियमवर चक्क मुख्य न्यायदंडाधिकाऱ्याचा फोन चोरट्यांनी पळवला
Thieves steal Chief Justice's phone at Wankhede Stadium

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर एक धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. मुंबईतील आयपीएल सामन्या दरम्यान मुख्य न्यायदंडाधिकाऱ्याच्या फोन चोरीला गेल्याची घटना घडली.
मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद सामन्या दरम्यान मुख्य न्यायदंडाधिकाऱ्याच्या आयफोन 14 चोरीला गेलाय. वानखेडे स्टेडियमवर IPLचा सामना पाहणयासाठी मुख्य न्यायाधिश कुटुंबियांसोबत गेले असताना हा प्रकार घडलाय. गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरांनी त्यांच्या खिशातून त्याचा फोन चोरल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, या चोरीनंतर अधिकाऱ्याने मुंबई पोलिसांकडे ऑनलाइन तक्रार दाखल केली असून त्यानंतर मरीन ड्राइव्ह पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
तर मुंबई पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे मुंबईतील न्यायालयात मुख्य न्यायदंडाधिकारी (सीजेएम) म्हणून कार्यरत असल्याची माहिती पुढे आली आहे.
मात्र गर्दीचा फायदा घेत मुख्य न्यायदंडाधिकाऱ्याच्या आयफोनवर चोरट्याने डल्ला मारल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
दुसरीकडे, आयपीएल (IPL) सामन्यावर क्रिकेट बेटिंग लावणार्या व्यक्तीला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा-11 च्या पोलिसांनी ताब्यात घेतलंय. माणिकचंद कृपाशंकर मौर्या असे या ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
शनिवारी रात्री माणिकचंद हा राजस्थान रायल आणि लखनौ सुपर जायंट या ILP वरील टिमवर बेटिंग खेळत होता. यासाठी www.universalsport24.com या वेबसाईटचा वापर करण्यात आला होता. याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत त्याला रंगेहाथ पकडले आहे.
पोलिसांनी त्याच्याजवळून बेटींगसाठी वापरला जाणारा मोबाइलही ताब्यात घेतला असून त्यात मोबाइलमधील अनेक स्क्रिन शाॅर्ट मिळून आलेत, जे बेटिंग संदर्भातले होते.
गुन्हे शाखेच्या पोलिसांनी माणिकचंदकडे अधिक चौकशी केली असता, त्या वेबसाईटचा युजर आयडी व पासवर्ड देवसिंग नावाच्या व्यक्तीकडून घेतल्याची कबूली त्याने दिली आहे.
हे बेटिंग रॅकेट मोठं असण्याची शक्यता असून यात अनेकांचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यानुसार मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा ११ चे पोलिस अधिक तपास करत आहेत.