अडचणी वाढणार ? अंजली दमाणियांनी, छगन भुजबळांना पुन्हा घेरले

Will the problems increase? Anjali Damania surrounds Chhagan Bhujbal again

 

 

 

संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा मंत्रीपदाचा राजीनामा झाल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आता पुन्हा अॅक्शन मोडमध्ये आल्या आहेत.

 

अंजली दमानिया यांच्या रडारवर राज्याचे मंत्री छगन भुजबळ आले आहे. छगन भुजबळ यांच्याविरोधात कोर्टात धाव घेतली आहे.

महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना न्यायालयाकडून मिळालेल्या निर्दोष मुक्ततेला सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

 

उच्च न्यायालयाने दमानिया यांची याचिका स्वीकारली असून, न्यायमूर्ती शिवकुमार डिगे यांच्या खंडपीठासमोर 12 जून रोजी सुनावणी होणार आहे.

 

महाराष्ट्र सदनाच्या बांधकामात झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहारात छगन भुजबळ यांच्यावर गंभीर आरोप झाले होते. आरोपानुसार, बांधकामासाठी सरकारी निधीचा गैरवापर करण्यात आला होता

 

आणि काही कंपन्यांना नियमबाह्य लाभ देण्यात आले होते. या प्रकरणात ईडी आणि एसीबीने भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबीयांविरुद्ध गुन्हे दाखल केले होते. दीर्घकालीन तपासानंतर काही प्रकरणांमध्ये भुजबळ यांना जामीन मिळाला. तर काही प्रकरणांत निर्दोष मुक्तता जाहीर झाली.

 

 

मात्र, अंजली दमानिया यांनी न्यायालयात सादर केलेल्या याचिकेत असा दावा केला आहे की, भुजबळ यांच्याविरोधात भक्कम पुरावे असूनही त्यांना निर्दोष मुक्त करण्याचा निर्णय चुकीचा आहे.

 

‘भुजबळ हे घोटाळेबाजच आहेत, त्यांची निर्दोष मुक्तता अन्यायकारक आहे,’ असा ठपका त्यांनी ठेवला आहे. सध्या न्यायालयाला उन्हाळी सुट्टी सुरू असल्याने या प्रकरणी पुढील सुनावणी 12 जून रोजी निश्चित करण्यात आली आहे. सुनावणी दरम्यान, याचिकेतील मुद्दे आणि सरकारी बाजूचे उत्तर विचारात घेऊन अंतिम निर्णय दिला जाणार आहे.

 

2007-2009 च्या दरम्यान, दिल्लीतील “महाराष्ट्र सदन”चे नूतनीकरण व नवीन बांधकाम सुरू करण्यात आले. या कामासाठी राज्य सरकारने जवळपास 326 कोटी रुपयांचा खर्च मंजूर केला होता.

 

त्यावेळी सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री छगन भुजबळ होते (राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात ते होते). बांधकामासाठी कंत्राट देण्यात आले. मात्र, या कंत्राटाच्या प्रक्रियेत पारदर्शक नसल्याचा आरोप करण्यात आला.

 

भुजबळ यांनी आपल्या निकटवर्तीय कंपन्यांना नियम मोडून फायदे दिले आणि सरकारी पैशांचा गैरवापर केला, असे आरोप करण्यात आले. अंजली दमानिया आणि किरीट सोमय्या यांनी हा विषय लावून धरला.

 

आर्थिक गुन्हे शाखा आणि अंमलबजावणी संचालनालय यांनी छगन भुजबळ, त्यांचा मुलगा पंकज भुजबळ आणि पुतण्या समीर भुजबळ यांच्याविरोधात गुन्हे दाखल केले. त्यानंतर छगन भुजबळ यांना अटक झाली आणि ते 2016-2018 या कालावधीत तुरुंगात होते.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *