अभिनेत्री जिवंतच मात्र अजित पवार भाषणात म्हणाले ती आपल्याला सोडून गेली
The actress is alive but Ajit Pawar said in his speech that she has left him

प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडे हिचा कर्करोगामुळे मृत्यू झाल्याची ‘अफवा’ काल समोर आली होती. खुद्द पूनमच्या सोशल मीडिया अकाऊण्टवरुन ही घोषणा करण्यात आल्यामुळे नेटिझन्स एकाच वेळी दुःखात आणि धक्क्यात होते.
आज दुपारी एक वाजता खुद्द पूनमनेच लाईव्ह येत स्वतःच पेरलेल्या मृत्यूच्या चर्चांना उधळून लावलं. केवळ सर्वायकल कॅन्सरबद्दल जनजागृती करण्यासाठी हा ‘स्टंट’ केल्याची कबुली तिने दिली.
मात्र हे ‘अपडेटेड’ वृत्त कदाचित उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापर्यंत तोवर पोहोचलं नसावं. कारण भाषणा दरम्यान बोलताना अजित पवार यांनी दुःख व्यक्त केलं. अर्थात यामध्ये अजित पवार यांची कुठलीही चूक म्हणता येणार नाही.
सोलापूर शहरातील महानगरपालिका आरोग्य केंद्रात महिला सर्वरोग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमाला उपस्थित होते.
महिलांच्या आजाराबाबत बोलताना अजित पवारांनी पूनम पांडेच्या मृत्यूबाबत उल्लेख केला. महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असा सल्ला दिला आहे.
अजित पवार म्हणाले की, “धकाधकीच्या जीवनात काम करताना कधी कोणता आजार होईल, हे आपल्याला सांगता येत नाही. आजच सकाळीच मी बातमी वाचली. एक कमी वयाची पांडे म्हणून एक अभिनेत्री होती,
पण तिला गंभीर असा आजार झाला, फार कमी वयात ती आपल्याला सोडून गेली. मला एकच तुम्हाला सांगायचं आहे, तुम्ही स्वतःची काळजी घ्या, आम्ही सरकार म्हणून तुमची काळजी घेऊच, महापालिकाही तुमची काळजी घेईल.” असं अजित पवार सांगत होते.
कार्यक्रम संपल्यानंतर अजित पवार राष्ट्रवादीचे स्थानिक नेते किसन जाधव यांच्या घरी स्नेहभोजनासाठी गेले. सोबत रुपाली चाकणकर याही होत्या.
माध्यमांनी रुपाली चाकणकर यांच्या ही बाब लक्षात आणून दिल्यावर किसन जाधव यांच्या घरी स्नेहभोजन करताना पूनम पांडेबाबत माहिती मिळाली, पूनम पांडे अजून हयात आहे, असे रुपाली चाकणकर यांनी सांगितले.
सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासकीय बैठक घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नियोजन भवन या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली.
सोलापुरातील स्थानिक पातळीवर असलेल्या सर्व परिस्थितीचा आढावा घेत माध्यमांशी संवाद साधला. राज्याच्या कायदा व सुव्यवस्था याबाबत माहिती देताना,
महेश गायकवाड आणि गणपत गायकवाड यांच्यात झालेल्या गोळीबाराविषयी अजित पवारांनी चुकीची घटना घडली आहे, अशी माहिती दिली.
पोलीस कायदेशीर प्रक्रिया पार पाडतील योग्य ती कारवाई करतील असे सांगितले. खा.सुप्रिया सुळेंनी गृहमंत्री फडणवीसांचा राजीनामा मागितला आहे, त्यावर उत्तर देताना सुप्रिया सुळेंच्या प्रतिक्रियेला उत्तर देण्यास मी बांधील नाही असे अजित पवारांनी स्पष्टपणे सांगितले.
प्रसिद्ध अभिनेत्री पूनम पांडे हिच्या मृत्यूची अफवा होती. अनेकांनी पूनम पांडेच्या मृत्यूबाबत सोशल मीडियावर दुःख व्यक्त केले होते.
मात्र अचानक पूनम पांडेने स्वतः माध्यमांसमोर येत आपण जिवंत असल्याची माहिती दिल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्काच बसला.
सर्वायकल कॅन्सरबद्दल जनजागृती करण्यासाठी हा प्रकार केल्याची कबुली तिने दिली. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पूनम पांडेच्या निधनाची माहिती घेतली होती, मात्र ती जिवंत असल्याची माहिती अजित पवारांना नसल्याने त्यांनी भर सभेत दुःख व्यक्त केले.