शाळेच्या वेळांमध्ये बदल; सरकारची मोठी घोषणा
changes in school hours; A big announcement by the government

सकाळी ७ किंवा ८ वाजता शाळा असली की विद्यार्थ्यांना रोज पहाटे उठावं लागतं. इयत्ता पहिली आणि दुसरीच्या चिमुकल्यांची यामुळे झोप पूर्ण होत नाही.
याचा परिणाम त्यांच्या तब्येतीवर देखील होतो. त्यामुळे शाळेच्या वेळेबाबत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. इयत्ता दुसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची सकाळची शाळा देखील ९ नंतरच सुरू होणार आहे.
विद्यार्थ्यांची झोप पूर्ण झाली नाही तर डोकेदुखी सारख्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे राज्यपाल रमेश बैस यांनी ही गोष्ट समोर आणली होती.
त्यावर आता शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी वेळेबाबत ही घोषणा केली आहे. याबाबत लवकरच अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.
बदलत्या जीवनशैलीमुळे लहान मुलांच्या आरोग्याचा विचार केला तर त्यांच्यासाठी झोप महत्वाची आहे. त्यामुळे शाळेच्या वेळेबाबत सरकारने विचार करावा, असं राज्यपालांनी काही दिवसांपूर्वी सुचवलं होतं.
त्यावर निर्णय घेण्यासाठी सरकारने मनोवैज्ञानिक, बालरोगतज्ज्ञ यांची समिती स्थापन केली आहे. या समितीकडून शेवटचा अहवाल आल्यावर पुढील निर्णय घेतला जाणार आहे, असं माध्यमांशी बोलताना मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलं.
माध्यमांशी संवाद साधताना केसरकरांनी पुढे म्हटलं की, शाळांच्या वेळेबाबतचा नियम पुढील शैक्षणिक वर्षापासून लागू करण्यात येणार आहे.
सकाळच्या सत्रातील शाळेची वेळ ७ ऐवजी ९ किंवा त्यापेक्षा पुढे ढकलण्यात येणार आहे. बालवाडी, छोटा शिशू आणि मोठा शिशू हे वर्ग मुख्य शाळेला जोडण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.