प्रियांका गांधी लोकसभा लढवणार?
Priyanka Gandhi will contest the Lok Sabha?

काँग्रेस पक्षाने गेल्या काही महिन्यांपासून प्रतिक्षेत असलेल्या संघटनात्मक बदलाला मूर्तस्वरुप दिले असले तरी, पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांना पक्षाकडून काय जबाबदारी दिली जाईल,
यावर अद्याप पक्षाने कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नाही. यासंदर्भात येत्या काही दिवसांत पक्षाची भूमिका स्पष्ट होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर इतर राज्यांच्या प्रचारात भाग घेण्यास सुरूवात केली.
गेल्या काही महिन्यांपासून हिमाचल प्रदेश, कर्नाटक आणि नुकत्याच संपलेल्या पाच राज्यांच्या निवडणुकीच्या प्रचारातही त्यांनी मोठी भूमिका पार पाडली आहे.
हिमाचल प्रदेश आणि कर्नाटकमध्ये राहुल गांधी यांच्या अनुपस्थितीमध्ये काँग्रेसच्या स्टार प्रचारक म्हणून त्याच सहभागी झाल्या होत्या.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी जाहीर केलेल्या संघटनात्मक बदलांमध्ये प्रियांका गांधी यांना पक्षाच्या सरचिटणीसपदी कायम ठेवले आहे.
परंतु त्यांना अद्यापही जबाबदारी दिलेली नाही. आतापर्यंत उत्तर प्रदेशची जबाबदारी सांभाळणाऱ्या प्रियांका गांधी यांच्याऐवजी आता उत्तर प्रदेशामध्ये पक्ष वाढविण्याची जबाबदारी महाराष्ट्रातील नेते अविनाश पांडे यांच्यावर सोपविली आहे.
प्रियांका गांधी यांना पक्ष मोठी जबाबदारी देणार असल्याचे संकेत काही नेत्यांनी दिले आहेत. काही महिन्यांवर आलेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी प्रियांका गांधी यांना मिळण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.
याशिवाय प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवतील, अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे. सोनिया गांधी आरोग्याच्या समस्यांमुळे रायबरेली मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास उत्सुक नाहीत.
रायबरेली किंवा अमेठी या काँग्रेसच्या पारंपरिक मतदारसंघातून प्रियांका गांधी यांना मैदानात उतरविले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.