ॲमेझॉन कंपनीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश
To file a fraud case against Amazon company
ग्राहकाला बनावट घड्याळ विकणे ॲमेझॉन कंपनीच्या चांगलेच अंगलट आले आहे. या प्रकरणात मुख्य न्याय दंडाधिकारी न्यायालयाने कळमना पोलिस ठाण्याला ॲमेझॉन
आणि एम. के. मार्केटिंग कंपनी विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहे. परमजितसिंग कलसी यांनी कंपनी विरोधात न्यायालयात धाव घेतली आहे.
या प्रकरणी मुख्य न्यायदंडाधिकारी एस. टी. दंडे यांनी निर्णय दिला. अर्जानुसार, कलसी यांनी ब्रँडेड कंपनीचे घड्याळ स्वस्त दरात विकत घेण्यासाठी इंटरनेटवर शोधा-शोध केली.
त्यांना आवडलेले १ हजार ८९८ रुपयांचे घड्याळ ॲमेझॉन कंपनीच्या वेबसाइटवर त्यांना उपलब्ध दिसले. एम. के. मार्केटिंग कंपनी ॲमेझॉन च्या माध्यमातून हे घड्याळ विकत होती.
त्यावेळी स्विझरलँड येथील ब्रँडेड रेडो कंपनीच्या त्या घडाळ्याचे सुंदर-सुंदर फोटोसुद्धा त्यांना पाहायला मिळाले. कलसी यांच्याकडे ॲमेझॉनचे वार्षिक सबस्क्रिप्शनसुद्धा असल्याने
१९ डिसेंबर २०२१ रोजी ऑनलाइन पैसे जमा करीत त्यांनी ते घड्याळ ऑर्डर केले. दिल्ली येथील एम के मार्केटींगने ती ऑर्डर स्वीकारली.
लागलीच २३ तारखेला त्यांना हे घड्याळ त्यांना प्राप्त झाले. घड्याळ घेतल्याच्या उत्साहापाई मुलांनी व्हिडिओ रेकॉर्डींगकरीत ते पॅकेट उघडले.
मात्र, ब्रँडेड ऐवजी सर्वसाधारण घड्याळ मिळाल्याने कलसी कुटुंबीयांच्या उत्साहावर पाणी फेरले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी कळमना पोलिस ठाण्यात धाव घेतली.
परंतु, पोलिसांनी कुठलाही गुन्हा दाखल न केल्याने कलसी यांनी ॲमेझॉन आणि विक्रेत्या विरोधात त्यांनी न्यायालयात धाव घेत अर्ज दाखल केला.
न्यायालयाने ॲमेझॉन कंपनीवर गुन्हा दाखल करायचे आदेश दिले. तसेच, कळमना पोलिसांना तपासकरीत याचा नियमानुसार अहवाल दाखल करण्याचे आदेश देत अर्ज निकाली काढला. कलसी यांच्यातर्फे एडवोकेट आकाश तिवारी यांनी बाजू मांडली.
सामान्यपणे कलसी यांनी ऑर्डर केलेले घड्याळाची किंमत एक लाख रुपयांच्यावर आहे. मात्र, ॲमेझॉनने याच घड्याळाचे चांगले चांगले फोटो दाखवत ते स्वस्त किमतीत देण्याचे कलसी यांना आमिश दिले.
शिवाय, घड्याळ ब्रँडेड असूनही त्या कंपनीचे वॉरंटी कार्ड देखील त्यांना सोबत मिळाले नाही. मनस्ताप सहन करावा लागल्याने कलसी यांनी न्यायालयात धाव घेतली