थेट ब्रिटनमध्ये निवडणूक लढवतोय मराठवाड्याचा सुपुत्र
The son of Marathwada is directly contesting elections in Britain
ब्रिटिश संसदेच्या गुरुवारी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत लंडनमधील ब्रेंट वेस्ट मतदारसंघातून कन्झर्व्हेटिव्ह (हुजूर) पक्षातर्फे मूळचे
छत्रपती संभाजीनगरवासीय सुशील रापतवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. विरोधी लेबर (मजूर) पक्षाच्या विद्यमान खासदार गॅरी गार्डिनर यांच्याविरोधात ते लढत देतील.
या मतदारसंघात भारतीय मतदारांची संख्या लक्षणीय असल्याने २७ वर्षांनंतर चमत्कार घडेल, असा विश्वास रापतवार यांनी व्यक्त केला. सुशील रापतवार मूळचे छत्रपती संभाजीनगरचे.
सेंट फ्रान्सिस शाळेतून दहावी, देवगिरी महाविद्यालयातून बारावी, पुण्याच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून इन्स्ट्रुमेंटेशन विषयात पदवी मिळविल्यानंतर त्यांनी मुंबई, दिल्ली, कोलकता येथे नोकरी केली.
त्यानंतर पाच वर्षे सिंगापूरमध्ये नोकरी केली. तिथून एमबीए करण्यासाठी लंडनला पोचले आणि तिथेच स्थायिक झाले. सन २००६मध्ये ते लंडनच्या महाराष्ट्र मंडळाचे सदस्य झाले.
२०१२ ते २०१९ अशी सात वर्षे महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष म्हणून काम केल्यानंतर त्यांनी सामाजिक कार्य सुरू केले. आयटी कंपनीत नोकरी आणि सामाजिक कार्य करता करता ते स्थानिक राजकारणात उतरले.
अर्थातच त्यांना स्थानिक व भारतीय मंडळींचा पाठिंबा होता. त्याच्या जोरावर त्यांनी २०२२ मध्ये ब्रेंट वेस्टमधील स्थानिक अध्यक्षपदाची निवडणूक
हुजूर पक्षाकडून लढवली आणि त्यात त्यांचा पराभव झाला. मात्र, त्या वेळी मिळालेल्या पाठिंब्याच्या जोरावर राजकीय क्षेत्रात ते सक्रिय राहिले.
यंदा ते पुन्हा सार्वत्रिक निवडणुकीत उतरले आहेत. ‘महाराष्ट्र टाइम्स’शी बोलताना रापतवार म्हणाले, ‘लंडनमधील ब्रेंट वेस्ट मतदारसंघात ७४ हजार मतदार आहेत.
येथील निवडणुका मतपत्रिकेद्वारे होतात. सहा जण निवडणूक रिंगणात आहेत. या मतदारसंघात ३० ते ४० टक्के भारतीय वंशाचे मतदार आहेत.
त्यापैकी बहुतांश गुजराती आहेत. मी आजवर केलेल्या कामाच्या व पक्षाच्या ध्येयधोरणांच्या आधारे मत मागत आहे. या मतदारसंघातून
मजूर पक्षाचे गॅरी गार्डिनर २७ वर्षे निवडून येत आहेत. त्यामुळे अनुभवी विरुद्ध नवखा अशी ही लढत होणार आहे. निवडणुकीत चमत्कार घडेल अशी अपेक्षा आहे.’