मोठी बातमी; शरद पवार गटाचा नेता येणार महायुतीत ;त्यांच्यासाठीच मंत्रिमंडळ विस्तार थांबविला
big news; The leader of Sharad Pawar's group will be in the grand alliance; Cabinet expansion was stopped for him

मागील काही दिवसांपासून मंत्रिमंडळ विस्ताराची सतत चर्चा होत असते. मात्र, अनेकदा मंत्रीमंडळ विस्ताराचे मुहूर्त हुकल्याचे पाहायला मिळाले.
दरम्यान, याच मंत्रिमंडळ विस्तारावर बोलतांना शिंदे गटाचे प्रवक्ते तथा आमदार संजय शिरसाट यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. ‘जयंत पाटील भाजपबरोबर येणार असल्याने मंत्रिमंडळाचा विस्तार थांबला होता’, असे शिरसाट म्हणाले आहेत.
यावेळी बोलतांना शिरसाट म्हणाले की, “भाजपबरोबर जाण्याचा जयंत पाटील यांनीच प्रस्ताव दिला होता. याबाबत चर्चा झाली होती, आपण सर्व मिळून शरद पवार साहेबांना सांगू हे बैठकीमध्ये ठरलं होतं.
आजही जयंत पाटील फक्त शरीराने तिकडे आहेत मनाने अजित पवारांबरोबर आहेत. त्यामुळे, आमच्या माहितीप्रमाणे जयंत पाटील येणार होते म्हणून विस्तार थांबला होता, असे शिरसाट म्हणाले आहेत.
तसेच, त्यांना काही अडचणी आल्या असतील म्हणून ते आले नसतील. पण ते येतील आणि त्यांना यायला जास्त वेळ लागणार नाही,” असेही शिरसाट म्हणाले. छत्रपती संभाजीनगरच्या आपल्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषेदत ते बोलत होते.
दरम्यान याचवेळी उद्धव ठाकरे यांच्यावर देखील शिरसाट यांनी टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांनी राम मंदिर उद्घाटन सोहळ्यावरून केलेल्या आरोपाला उत्तर देतांना शिरसाट म्हणाले की, “राम मंदिर हा भाजपचा कार्यक्रम नाही.
कोणी पक्षाचा हा कार्यक्रम नाही. राम मंदिर उभारणीसाठी प्रत्येक भारतीयांचा हात लागलेला आहे. हा एक आनंदाचा क्षण असून, त्यात मिठाचा खडा कोणी टाकु नये. कारसेवक सर्वच पक्षाचे होते,” असे शिरसाट म्हणाले आहेत.
शिरसाट यांनी संजय राऊत यांच्यावर देखील टीका केली आहे. “संजय राऊत यांना संध्याकाळी देव पार्टीला जाण्यापासून प्रॉब्लेम झाला असेल,
म्हणून त्यांनी हे वक्तव्य केलं असेल. रेव पार्टी, नाईट लाईफ हे प्रकार कोणी सुरू केले होते हे त्यांना चांगलं माहिती आहे,” असेही शिरसाट म्हणाले आहेत.
सिंधुदुर्गमधील देशातील पहिला पाणबुडी प्रकल्प गुजरातमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान, यावरून विरोधकांकडून सरकारवर टीका देखील केली जात आहे.
यावर बोलतांना शिरसाट म्हणाले की, “पाणबुडीचा उद्योग गुजरातला गेल्याची बातमी आली असली तरीही याला कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
परंतु, महाराष्ट्रात येणाऱ्या उद्योगांची चर्चा होतांना दिसत नाही. मागे असेच हिऱ्याचा उद्योग गुजरातला गेला असल्याचं सांगितलं गेलं.
पण, पाणबुडीचा प्रकल्प राज्यबाहेर जाऊ देणार नाही. यासाठी सर्व प्रयत्न केले जातील. महाराष्ट्रात अनेक उद्योजक येण्यासाठी इच्छुक असतात, त्यासाठी पाऊल टाकण्याचे काम या सरकारने केलेल आहे,” असे शिरसाट म्हणाले.