अजित पवारांनी नरेंद्र मोदीचं केले तोंडभरून कौतुक;म्हणाले , सर्वांना नोकऱ्या देऊ शकत नाहीत, पण ……
Ajit Pawar praised Narendra Modi; He said, they cannot give jobs to everyone, but...

राज्यात आगामी निवडणूकांच्या तयारीला वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. सर्वच राजकीय पक्षांचे नेत सभा, मेळावे घेत आहेत.
या दरम्यान आज ठाण्यात झालेल्या सभेत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पुन्हा शरद पवारांवर त्याच्या वयाचा उल्लेख करत निशाणा साधला.
इतकेच नाही तर अजित पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं तोंडभरून कौतुक देखील केलं आहे. आपण नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी निवडून आणण्यासाठी एकत्र आल्याचे देखील अजितदादा म्हणाले.
आम्ही ठरवलं की प्रश्न सोडवायचे असतील तर आपण सत्तेत गेलं पाहिजे, आज देश पातळीवर मोदींसारखं दुसरं नेतृत्व नाही. भारताला प्रतिष्ठा मिळवून देण्याचं काम त्यांच्या नेतृत्वात झालं आहे.
मधल्या काळात जग अचंबित झालं, आपलं चांद्रयान हे चंद्रावर पोहचलं. सर्वांनी कौतुक केलं. साधी गोष्ट नव्हती, असेही अजित पवार म्हणाले.
देशातील ८० कोटी जनतेला मोफत अन्नधान्य मोदी देत आहेत. प्रत्येकाला घर देण्याचं कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. सर्वांना नोकऱ्या देऊ शकत नाहीत,
पण काहींना नोकऱ्या आणि काहींना बँकेचं सुलभ कर्ज देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांना वर्षाला १२ हजार वर्षाला मिळतात. शेतमालाला चांगला बाजारभाव कसा मिळेल यासाठी आम्ही काम करत आहोत असेही अजित पवार म्हणाले.
तुमच्या भागातील प्रश्नांची सोडवण्यासाठी मी मुंबईत असतो, आठवड्यातील तीन-चार दिवस सार्वजनिक काम घेऊन कधीही हक्काने या असेही अजित पवार म्हणाले.
प्रश्न सोडवण्यासाठी आपण सरकारमध्ये गेलो आहोत. बहुजन समाजाच्या कल्याणाकरिता आपण सरकारमध्ये गेलो. आपला वैयक्तिक कुठलाही स्वार्थ नव्हाता.
स्व. यशवंतराव चव्हाण यांनी देखील सांगितलं पदाचा वापर हा सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी करायचा असतो ही त्यांची शिकवण आहे त्यानुसार आपण पुढे चाललो आहोत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भाजप आणि शिवसेना हे महाराष्ट्राच्या भल्यासाठी एकत्र आलो आहोत. देशाच्या वाटचालीसाठी आणि नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याकरिता आपण एकत्र आलो आहोत.
२४ तासातील अठरा-अठरा तास काम करत आहेत. साडे नऊ वर्षात कधी पंतप्रधानांना दिवाळी पाहिली नाही. दिवाळीला घरी न थांबता बॉर्डरवर जाऊन जवानांसोबत त्यांनी दिवाळी साजरा केली. हा सगळा इतिहास आपल्या सोबत आहे असे अजित पवार म्हणाले.
अजित पवार म्हणाले की, वय झाल्यानंतर थांबायचं असतं, ही वर्षानुवर्षे चालत आलेली परंपरा आहे. पण काहीजण ऐकायला तयार नाहीत, हट्टीपणा करत आहेत.
राज्य सरकारमध्ये ५८ ला रिटायर होतात. काहीजण साठीला काहीजण सत्तरीला तर काहीजण पंचाहत्तरील रिटायर होतात. माणूस ऐंशी,
चौऱ्याऐंशी झालं तरी रिटायर होत नाही.आम्ही आहोत ना करायला, आमच्यामध्ये तेवढी धमक आहे, पाच-सहा वेळी उपमुख्यमंत्रीपद आम्ही सांभाळलं आहे.